मुंबई : सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्यानंतर आता सीबीआयची टीम उद्या गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहे. ही टीम मुंबईत येऊन सुशांतच्या घराची पाहणी करून नंतर मुंबई पोलिसांचीही भेट घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उद्या येणाऱ्या सीबीआय एसआयटीच्या टीममध्ये दोन एसपी आणि एका तपास अधिकाऱ्याचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. त्यामुळे सीबीआयच्या टीमनेही तपास कामाला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीबीआय एसआयटीची टीम उद्या मुंबईत येणार आहे. सीबीआयने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापन केली होती.
ही टीम मुंबईत आल्यावर सुशांतच्या घराची पाहणी करणार आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांची भेट घेणार आहे. यावेळी मुंबई पोलिसांकडून सीबीआयला सुशांतप्रकरणाशी संबंधित कागदपत्रे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीबीआय मुंबई पोलिसांकडून सुशांतप्रकरणाची केस डायरी आणि शवविच्छेदन अहवालही घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे न देता तो सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. बिहार सरकार या प्रकरणाचा तपास करण्याची शिफारस करण्यास सक्षम असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.
* महाराष्ट्र सरकार निर्णयाला देणार आव्हान
मुंबई पोलिसांनी तपास केलेला नसून केवळ चौकशी केली आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पूर्णपणे सीबीआयकडे सोपवले आहे. या पुढे या प्रकरणात कोणताही एफआयआर दाखल झाल्यास तो सीबीआयच पाहण्याचे काम करेल, असेही कोर्टाने म्हटले आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे वृत्त आहे.