मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल देत सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल म्हणजे राज्य सरकारसाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. सुशांत सिंह प्रकरणाच्या संबंधित सर्व कागदपत्रे, पुरावे हे सीबीआयकडे सोपवण्यासही सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सांगितले आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी दोन ट्वीट्स केले आहेत. आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या यांनी म्हटलं, “महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलीस आयुक्तांनी २ महिने एफआयआर न घेणे दुर्देवी आहे. सुशांत सिंहच्या परिवाराला न्याय मिळेल”
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तर आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या यांनी म्हटलं, सुशांत सिंह प्रकरणासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हावा. मला आशा आहे की, आता तरी ठाकरे सरकार काही तरी शिकेल आणि सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांना न्याय मिळेल. तर किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की आता ठाकरे सरकारची दादागिरी संपेल.
सुशांत सिंह राजपूत याचा राहत्या घरात मृतदेह आढळला. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सुशांतने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यानंतर या प्रकरणात विविध अँगल्स समोर येऊ लागले आणि त्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी आपला तपास सुरू केला. तर त्याच दरम्यान या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी सुशांतचे कुटुंबीय, भारतीय जनता पक्षाचे नेते करु लागले. तसेच सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांत तक्रार दाखल करत आर्थिक गैरव्यवहार आणि सुशांतला आत्महत्या करण्यास रियाने प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता.
आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा असे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतचे कुटुंबीय, रिया चक्रवर्ती, महाराष्ट्र सरकार, बिहार सरकार या सर्वांची बाजू ऐकून घेतली आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.