मुंबई : सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई पोलीस, बिहार पोलीस, ईडी तसेच सीबीआय तपास करत होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने अधिकृतरीत्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. सर्वोच्च न्यायालयानं हा आदेश दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एकच प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सत्यमेव जयते! असं ट्वीट पार्थ पवार आणि चित्रा वाघ यांनी आपापल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलं आहे. दोघांच्या एकसारख्याच ट्वीटमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
पार्थ पवार यांनी राम मंदिराला शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. पार्थ पवार यांनी भाजपला अनुकूल भूमिका घेतल्याने पवार कुटुंबातील वातावरण चांगलंच तापलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, याप्रकरणी माझ्या नातवाच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. पार्थ पवार आणि चित्रा वाघ यांच्या एकसारख्या प्रतिक्रियांमुळे येत्या काळात राजकीय वर्तुळात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे. आता परत महाविकासआघाडीचे शिल्पकार असलेले शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने खळबळ माजली आहे. कारण पवारांनीही मुंबई पोलिसावर विश्वास असल्याचे सांगत सीबीआय तपासला नापसंतीच दर्शवली होती.