पुणे : गेल्या महिन्यापासून दुधाला वाढीव दर मिळावा, यासाठी राज्यभर आंदोलन सुरु आहेत. विविध शेतकरी संघटनांतर्फे आंदोलन सुरू असताना भाजपनेही यात उडी घेऊन स्वतंत्रपणे आंदोलन सुरू केले आहे. आता दूधदराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बारामतीवर आता धडक मारली जाणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी 27 ऑगस्ट रोजी बारामतीत दूध दरवाढीसाठी जनावरांसहीत मोर्चा काढून आंदोलन छेडणार आहेत.
राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर घेण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला होता. त्या मुळे पवार व शेट्टी यांच्या दिलजमाई झाली, असेच चित्र राज्यासमोर उभे राहिले होते. साखर पट्टयात राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीच्या माध्यमातून अनेक आंदोलने उभी करत पवारांना शह देण्याचा प्रयत्न केला होता.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यात शरद पवार यांचीच महत्वाची भूमिका होती, या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी बारामतीत जावून दूध दरासाठी आंदोलन करणार असल्याने पुन्हा एकदा सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दूध दरवाढीसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात मोर्चांची मालिकाच सुरु केली आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापूरला हे आंदोलन झाले, उद्या नगरला असे आंदोलन होणार आहे, त्यालाही मी उपस्थित राहणार आहे, 24 ऑगस्ट रोजी सातारा येथे मोर्चा होणार आहे. पुणे जिल्ह्याचा मोर्चा आम्ही पुणे शहर वगळून बारामतीत घ्यायचा निर्णय घेतला आहे. अस राजू शेट्टी यांनी सांगितल आहे.