मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी “या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे” असे मत व्यक्त केले. आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी विचारला आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलिस आयुक्तांनी दोन महिने एफआयआर न घेणे दुर्दैवी आहे. सुशांतसिंह च्या परिवाराला न्याय मिळेल आणि ठाकरे सरकारची दादागिरी संपेल” असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले.
“सर्वसामान्य जनतेच्या मनात सुशांतसिंह प्रकरणासंदर्भात शंका कुशंका होत्या आणि त्यामुळेच सीबीआय चौकशीची अपेक्षा होती ती सन्माननीय कोर्टाने मान्यता दिली. त्यामुळे दूध का दूध पानी का पानी हे या प्रकरणात होईल आणि जे जनतेला अपेक्षित आहे तेच होईल. शेवटी मुंबई पोलीस असो बिहार पोलीस असो किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असो यांचा अंतिम उद्देश हा पारदर्शक पणे हे प्रकरण पुढे येणं.. गुन्हेगाराला शिक्षा होणे हेच आहे.. यामुळे पोलिसांमध्ये अनावश्यक जे वाद निर्माण झालेलं त्यालाही ब्रेक लागेल.. सीबीआई चौकशीतून सत्यस्थिती देशातील जनतेच्या समोर येईल.” अशी भूमिका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मांडली.
भाजप आमदार राम कदम यांनी निकालाच्या आधीच महाराष्ट्र सरकारला करारा झटका मिळेल, अशी प्रतिक्रिया दिली होती.
* उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच लक्ष्य
सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयला सुपूर्द केलीय. एकीकडे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाराष्ट्र सरकारसाठी मोठा धक्का मानला जातोय. तर, दुसरीकडे सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीमुळे राज्याच्या राजकारणातही वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार, बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी म्हणजे येत्या काळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे भाजपच्या टार्गेटवर असतील.