इस्लामाबाद : कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं उघड झालं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील याला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानमधील माध्यमांनीच यावर प्रकाश टाकला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्यावतीने (UNSC) जगभरातील 88 दहशतवादी नेत्यांची एक यादी तयार करण्यात आली आहे. यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांचीही नावं आहेत.
भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम कराचीमध्ये राहत असल्याचं शुक्रवारी पाकिस्तानने कबुल केलं. गेल्या अनेक वर्षांपासून दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये राहत आहे. भारताने वेळोवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा पाठपुरावा केला, पण पाकिस्तानने नेहमीच दाऊद देशात असल्याचं नाकारलं. मात्र, आता पाकिस्तानने दाऊद कराचीमध्ये असल्याचं कबुल केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दाऊद इब्राहीम पाकिस्तानमध्ये मुक्तपणे राहत असल्याचे पुरावे भारताने पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय संस्थेला (यूनो) वेळोवेळी दिले होते. मात्र, गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तान दाऊद कराचीत असल्याचं मान्य करत नव्हता. पाकिस्तानने ओसामा बिन लादेनही देशात नसल्याचं म्हटलं होतं. पण, अमेरिकेने ओबामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून मारलं होतं.
पाकिस्तान सरकारने दाऊद इब्राहिमची स्थिर आणि जंगम अशी सर्व मालमत्ता गोठवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अहवालात देण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमवर मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यामागे तोच मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे.
मुंबईतील या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 350 लोकांना आपला प्राण गमवावा लागला होता. तसेच 1200 हून अधिक लोक जखमी झाले होते. भारत सरकारने 2003 मध्ये अमेरिकेसोबत मिळून दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते.
संयुक्त राष्ट्र आणि इंटरपोलने दाऊद इब्राहिमला आशिया खंडातील सर्वात मोठा अमली पदार्थ तस्कर म्हणून घोषित केलं आहे. त्याचे दहशतवादी संघटनांशी देखील संबंध असल्याचं म्हटलं आहे. भारताची गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्यूरोच्या (आयबी) माहितीनुसार दाऊद इब्राहिम आणि त्याचा छोटा भाऊ शेख अनीस इब्राहिम सिंथेटिक ड्रग्ससोबतच हेरोईन आणि अफीमचाही व्यवसाय करतो.
दाऊदची कुख्यात डी-कंपनी इंटरनॅशनल सिंडिकेट क्राईम आणि हवाला ऑपरेशन करण्यावर भर देत असल्याचंही समोर आलं आहे. आतापर्यंत डी कंपनीचा ल्यारी गँगसोबत कोणताही वाद समोर आलेला नाही. ल्यारी कराचीमधील दाट वस्ती असलेला परिसर आहे. ल्यारी गुन्हेगारी टोळ्या, ड्रग आणि बंदूक यांच्या व्यवसायासाठी कुख्यात आहे.