लातूर : चालकाला मारहाण करून व त्याचे हातपाय व तोंड बांधून तेलाचा टँकर पळवून नेणाऱ्या तिघांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २०१४ मध्ये उजनीमोडवर (ता. औसा) मध्यरात्री ही जबरी चोरीची घटना घडली होती. अशा गुन्ह्यात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ असून निकालामुळे जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारावर चांगलाच वचक बसण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
येथील किर्ती गोल्ड कंपनीच्या तेलाचा टँकर घेऊन चालक बलभीम कासवीद (वय ५४, रा. टेंभूर्णी, जि. सोलापूर) हा ४ मार्च २०१४ रोजी बोरामणी (सोलापूर) येथे निघाला होता. टँकरमध्ये १६ हजार ९९० किलो कॉटन रिफाइंड तेल होते. पुण्यात वास्तव्यास असलेल्या सुरेश शेषराव साठे (वय ३१, रा. नांदुर्गा, ता. औसा), शाम विश्वनाथ शिंदे (वय ३५) व संदीप सौदागर भोजन (वय २३, दोघे रा. आशिव) या तिघांनी टँकर पळवून नेण्याच्या उद्देशाने एमआयडीसी मधूनच छोटा हत्ती वाहनाने टँकरचा पाठलाग सुरू केला.
मध्यरात्री साडेबारा वाजता उजनीमोडवर छोटा हत्ती आडवा लाऊन टँकरला गाठले व चालक कासवीद याला हॉकी स्टिक व लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याचे हातपाय बांधून व तोंड चिकटपट्टीने बंद करून तांदुळवाडी (ता. उस्मानाबाद) शिवारातील शेतातील पिकात फेकून दिले आणि टँकर पळवून नेला. स्वतःला तेल विक्री करणारे दलाल भासवून पंधारे (ता. बारामती) एमआयडीसीत या तेलाची विक्री केली. चालकाने सुटका करून घेत पोलिस ठाणे गाठले.
त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस अधीक्षक बी. जी. गायकर व अपर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या प्रकरणात लक्ष घातले. त्यानंतर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा तपास केला. यात सहायक सरकारी वकील अॅड. लक्ष्मण एन. शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.