मुंबई : राज्यासह देशभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. कोरोना संकटाच्या सावटाखाली सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून राज्यभरात बाप्पाचं आगमन होत आहे. मात्र अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडेच्या कृत्यामुळे एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. तरडे यांनी यावर थेट सोशलमीडियावर जाहीर माफी मागितली आहे.
कोरोना संकटामुळे अनेकांना डेकोरेशन करण्यासाठी साहित्य मिळालेली नाहीत. यामुळे अनेक जण वेगवेगळ्या कल्पना लढवून बाप्पाचं स्वागत करत आहे. प्रवीण तरडे यांनी घरच्या गणपतीची पुस्तकांचे मनोरे रचत प्रतिष्ठापना केली आहे. यावेळी तरडेंनी गणपतीच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधानाची प्रत ठेवल्याने वादाला तोंड फुटलं आहे.
तरडेंची कल्पना नेटकऱ्यांना काही आवडली नाही. हा फोटो पाहिल्यानंतर तरडेंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, तरडेंनी टीका होत असलेली पाहून नंतर ती पुस्तक बाप्पाच्या फोटोची पोस्टच डिलीट केली आहे. मात्र, तोपर्यंत या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.
* काय झालं होतं?
प्रवीण तरडे नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळा विचार करत असल्याने चर्चेत असतात. यावेळी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी पुस्तक गपणती ही संकल्पना ठेवत डेकोरेशन केलं होतं. त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. पण यानंतर काही वेळातच त्यांच्यावर टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली. प्रवीण तरडे यांनी गणेशमूर्तीच्या बाजूला पुस्तकांची सजावट केली होती. पण मूर्ती ज्या पाटावर ठेवली होती त्याच्या खाली संविधानाचे पुस्तक ठेवले होते. यावरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल व्हावे लागले.
* जाहीर माफीनामा; पोस्ट केली डिलीट
टीका होऊ लागल्यानंतर प्रवीण तरडे यांनी तात्काळ ती पोस्ट डिलीट केली. सोबतच माफी मागणारा एक व्हिडीओ अपलोड केला. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “माझ्या घरी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती. बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सर्वात मोठं प्रतिक अशी माझी एक भावना होती. पण मी केलेली चूक अनेकांनी माझ्या लक्षात आणून दिली. आरपीआय, भीम आर्मी तसंच लातूर आणि पुण्यातील संघटनांनी मला याची जाणीव करुन दिली. मी सर्व दलित बांधवांची, तसंच ज्यांच्या ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची जाहीर माफी मागतो”.