वेळापूर : माळशिरस तालुक्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर व पोलीस कोरोनायोद्धा म्हणून काम करीत आहेत. या संकल्पनेतून कोरोनायोद्धा स्वरूपाची इको फ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्याचे काम महाळूंग (गट नंबर 2) येथील बारा वर्षाच्या संस्कार लोणकर यांनी एखाद्या मूर्तीकाराप्रमाणे घरातील गणपतीची मूर्ती साकारली आहे. कोरोंनायोद्धाची गणेश मूर्ती तयार करून ‘कोरोनायोद्ध्यां’ची सगळी शस्त्रंही या बाप्पांच्या हाती दिली आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सर्वत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे लाखो भक्त बाप्पाच्या मूर्तीपासून ते आरास बनवण्यापर्यंत सर्व काही इको फ्रेंडली पद्धतीने करण्यावर भर देत आहेत. गेल्या चार वर्षापासून संस्कार लोणकर पर्यावरण पूरक व प्रदूषणमुक्त गणेश मूर्ती घरच्या घरी तयार करून गणेशोत्सव साजरा करीत असतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावर्षी सर्वत्र कोरोनाचे सावट असल्यामुळे त्याने कोरोनायोद्धाची गणेश मूर्ती तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी घरासमोरील बागेतील माती व रद्दी पेपरचा एकत्र वापर केला. त्यापासून गणेश मूर्ती तयार केली. कोरोनाची मूर्तीबरोबर एक हॉस्पिटलची उभारणी केली आहे. त्यामध्ये कोविड केअर सेंटरची स्थापना करून त्यामध्ये रुग्णांना ने-आन करण्यासाठी ॲम्ब्युलन्सची सोय सुद्धा त्या ठिकाणी केली आहे. तसेच मूर्तीच्या पाठीमागे पृथ्वी काढलेली असून त्याच्या बाजूला कोरोना विषाणूची प्रतिकृती तयार केली आहे. त्यावर कोरोंनाची लस कधी तयार होणार, लॉकडाऊन कधी संपणार असे अनेक संदेश देणारे फलक तयार करून देखावा तयार करण्यात आला आहे.
* असा आहे कोरोना योद्धा गणेश
मूर्ती साकारत असताना मूर्तीच्या निम्मा भाग पोलिस व निम्मा भाग डॉक्टर असा तयार करण्यात आला. मूर्तीला डॉक्टर व पोलिस याच्या युनिफॉर्मप्रमाणे रंगही दिला आहे. त्यामध्ये पोलिसांच्या हातात काठी व मास्क असे दाखवले आहे. डॉक्टरांच्या हातात मध्ये सानिटायझर ची बॉटल, तपासणी करण्यासाठी स्टेटस्कोप दाखवण्यात आला आहे. तसेच ‘घरीच राह सुरक्षित राहावा’ असा संदेश देणारा फलक डॉक्टरांच्या हातात दिला आहे.
* प्रदूषण मुक्त गणेशोत्सव
पर्यावरणास हानिकारक प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती न आणता अगदी काही मिनिटात विरघळणारी व घरीच मातीपासून बनवलेल्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. प्रदूषण मुक्त गणेशोत्सव हा केवळ विचार न ठेवता प्रत्यक्ष आचरणात आणला आहे. मोठ्या श्रद्धेने कोरोनायोद्धा गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.