नवी दिल्ली : काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी पक्षाच्या प्रमुख पदावरुन पायउतार होणार असल्याचं कळत आहे. काँग्रेसमधील २० पेक्षा अधिक बड्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहित नेतृत्व बदलाची मागणी केली होती. त्यानंतर सोनिया गांधी लवकरच अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांनी काँग्रेस नेत्यांना अध्यक्ष निवडण्यास सांगितलं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देशातील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्व बदलाची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. याविषयावर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून, पक्ष नेतृत्वा संदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी पत्रात केली आहे. काँग्रेस कार्यकारिणीतील बड्या नेत्यांची उद्या सोमवारी बैठक होणार आहे. त्यात बैठकीत नेतृत्वबदलाविषयी चर्चा होणार आहे.
सोनिया गांधी यांच्या प्रभारी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा एक वर्ष पूर्ण झाला आहे. त्यानंतर काँग्रेसमधून नेतृत्व बदलाची मागणी सुरु झाली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदिप सुरजेवाला यांनी यापूर्वी राहुल गांधी हेच अध्यक्ष होतील, असं सूचित केलं होतं. पक्षातील १०० टक्के कार्यकर्त्यांना असं वाटतं की राहुल गांधी हेच अध्यक्ष व्हावेत. रणदिप सुरजेवाला यांच्याशिवाय अनेक काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांनीच लवकरात लवकर अध्यक्षपद स्विकारावं अशी मागणी केली आहे.
काँग्रेस पक्षामध्ये सध्या अस्वस्थता आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पक्षातील काही नेते विशेषतः तरुण नेते, पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्वाची धुरा देण्यासाठी आग्रही आहेत. पक्षाच्या विविध पातळ्यांवर राहुल यांच्या नेतृत्वासाठी आग्रह करण्यात येत आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ तरुण नेतेच नव्हे तर, ज्येष्ठ नेतेही पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळेच जेष्ठ नेत्यांनी तसेच, आमदार, खासदारांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्वाविषयी फेरविचार करण्याची विनंती केलीय.
उद्या सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीतील बड्या नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत काही नेते सोनिया गांधी यांनीच पुढील काही काळ नेतृत्व करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. तर, सोनिया यांनी नकार दिल्यास राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी-वड्रा यांची नावे काँग्रेस नेतृत्वासाठी पुढं येण्याची शक्यता आहे.