कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीतही आयपीएलचा फिव्हर जोर धरू लागल्याचा दाखला कोल्हापुरात घडलेल्या घटनेमुळे मिळाला. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा सुरु होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना आता भारतातील क्रिकेट फिव्हर चांगलाच वाढताना दिसत आहे. एरवी आयपीएल स्पर्धेच्या काळात आपल्याला सोशल मीडियावर वेगवेगळ्या संघांच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेले पाहायला मिळते. मात्र, कोल्हापुरात हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या महेंद्रसिंह धोनी विरुद्ध रोहित शर्मा असा वाद रंगला आहे. याच वादातून शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे धोनीच्या एका चाहत्याला शेतात नेऊन बडवल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झाली नसली तरी या घटनेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनी याने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर धोनीच्या काही चाहत्यांनी डिजिटल फलक लावून त्याचे आभार मानले होते.
यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्याने त्याच्या चाहत्यांनीही कुरुंदवाडीमध्ये डिजिटल फलक लावले.
त्यामुळे कुरुंदवाडीत एमएस धोनी विरुद्ध रोहित शर्मा असे कोल्ड वॉर सुरु झाले होते. अशातच एका चाहत्याने विरोधी गटाच्या डिजिटल फलकावर ब्लेड मारला. यानंतर शाब्दिक बाचाबाची होऊन हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. तुर्तास हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले नसले तरी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
* विरेंद्र सेहवागने फटकारले
दोन दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा या दोघांचे समर्थक कोल्हापूर येथील कुरुंदवाडमध्ये एकमेकांना भिडल्याचा दावा करण्यात आला होता. या वृत्ताची खुद्द भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने दखल घेतली आहे. त्याने ट्विट करुन या चाहत्यांना फटकारले आहे. वेड्यांनो काय करत आहात. एकतर खेळाडू एकमेकांबद्दल प्रेमभावना ठेवतात किंवा जास्त बोलत नाहीत आपल्या कामाशी मतलब ठेवतात. पण, काही फॅन्स वेडे असतात. मारामारी करु नका. भारताच्या संघाला एकच आहे, असे माना.’ असे कॅप्शन दिले.