पुणे : कोरोना विषाणूंची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, मागील पाच महिन्यांपासून पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजे पीएमपीएमएल बंद ठेवण्यात आली होती. आता पुणे शहरात पीएमपीएमएल ३ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुणे आणि पिंपरी शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत बैठक पार पडली. राज्य शासनाच्या आदेशानुसार लॉकडाउन शिथील करण्यात आला. त्यानुसार शहरातील सर्व परिस्थिती पूर्ववत येण्यास मदत झाली आहे.
आता शहरातील सर्व नागरिकांचा विचार करता आणि पीएमपीएमएल सुरू करण्याची मोठ्या प्रमाणावर होत असलेली मागणी, लक्षात घेता पुणे महापालिकेत दोन्ही महापालिका अधिकारी आणि कर्मचारी वर्गात बैठक झाली. त्यामध्ये दीर्घ काळ चर्चा देखील झाली असून पीएमपीएमएल ३ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच प्रतिबंधीत क्षेत्र आणि मध्य भागातील पेठांचा भाग सोडून पीएमपीएमएलची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर महामंडळाकडील एकूण १३ डेपोंच्या १९० मार्गांवर ४२१ बसेसचे संचालनाचे नियोजन करण्यात आले आहे.
शहरातील प्रमुख रस्ते उपनगर या ठिकाणावरील गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळ आणि सायंकाळी पीएमपीएमएलची शटल सेवा सुरू राहणार आहे. त्याच बरोबर प्रत्येक बसमध्ये केवळ ५० टक्के प्रवासी असणार आहे. तसेच बसमध्ये प्रत्येक आसनावर मार्कींग हे पेटींगद्वारे करण्यात आले असून प्रवाशांनी सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.