नवी दिल्ली : 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी राहुल गांधी यांनी स्वीकारली आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गांधी-नेहरू घराण्याच्या बाहेरील व्यक्तीने आता अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी असे मत त्यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केले. काँग्रेस समितीने राहुल गांधींची ही भूमिका अमान्य केली. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या खांद्यावर पुन्हा नेतृत्वपदाची जबाबदारी आली.
आता वर्षभरानंतर प्रियंका गांधी यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा गांधी कुटुंब आणि अध्यक्षपदाची रखडलेली निवड याविषयीची चर्चा सुरू झाली. काँग्रेसने आपला मार्ग शोधावा असं म्हणत अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील असावा असं त्या म्हणाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षातले अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांची ‘यंग ब्रिगेड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांनी बंडाचा पवित्रा घेतला.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम-राम केला आणि ते भाजपमध्ये गेले. राहुल गांधींच्या जवळचे असणारे दुसरे नेते सचिन पायलट यांनीही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधींचे अत्यंत जवळचे मानले जाणारे खासदार राजीव सातव यांनीही नव्या वादाला तोंड फोडलं.
ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार कुमार केतकर यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाच पक्षाचं नेतृत्त्व करण्याची विनंती केली आहे. त्यांनी ट्विटरवरून तसं मत व्यक्त केलं आहे. “देशातील जुलूमशाहीविरोधात आणि घटनात्मक मूल्यांच्या संरक्षणासाठी कुणी ठामपणे उभं राहिलं असेल, तर ते म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधीच. आम्हाल माहित आहे तुम्ही अडचणींना तोंड देत आहात. मात्र, तरीही माझी प्रामाणिक विनंती आहे की, तुम्ही पक्षाचं नेतृत्त्व करत राहावं. इतर कुणाहीपेक्षा तुमच्या हातातच पक्ष सुरक्षित राहील,” असं कुमार केतकर यांनी मत मांडलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीनं प्रस्ताव मंजूर करत, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. सोनिया गांधी यांनी पक्षाचं नेतृत्त्व करावं, मात्र त्यांनी नकार दिल्यास राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं, असा प्रस्ताव मंजूर करत पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठवला आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘कम बॅक, राहुल जी’ म्हणत राहुल गांधींना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे.
राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांचे काँग्रेसचे मुख्यमंत्री अनुक्रमे अशोक गहलोत, भूपेश बघेल आणि कॅप्टन अमरिंदरसिंह यांनीही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाच जाहीर पाठिंबा दिलाय. अशोक गहलोत यांनी तर सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पाठवलेल्या पत्राबाबत नाराजीही व्यक्त केलीय.
* वर्षभरात दोघांचीच नावे
केंद्रात सत्ताधारी भाजप पक्षाला हरवायचे असेल तर सर्वप्रथम काँग्रेसला सक्षम होणं गरजेचं आहे हे काँग्रेस नेत्यांनाही मान्य आहे. पण काँग्रेसमधला अंतर्गत कलह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राहुल गांधी यांची अध्यक्षपदावर निवड करण्यासाठी काही काँग्रेस नेते आग्रही आहेत. गेल्या वर्षभरात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या नेतृत्वपदासाठी एकही नाव समोर आलेले नाही.