सोलापूर : विविधतेतून एकता असलेला आपला भारत देश. हिंदू मुस्लीम ऐक्याच्या अनेक घटना आणि अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला घडताना आपण पाहतो. मग एखादं संकट असो किंवा सणवार, विविधतेने नटलेल्या परंपरेचं दर्शन आपल्याला घडतच असतं. असाच एक प्रसंग गणेश चतुर्थीला उस्मानाबादमधील कळंब इथे घडला.
एका चिमुकल्याच्या हट्टापायी एका मुस्लीमधर्मियांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले. अस्लम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्याने आपल्या चिमुकल्याचा हट्ट पुरवला आणि घरात क्यूट बाप्पाची प्रतिष्ठापना आणि आरतीची झाली. अस्लम शेख यांनी फेसबुक पोस्टद्वारे हा संपूर्ण प्रसंग कथन केला आहे. त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याने अब्रारने अम्मीकडे गणपती आणायचा हट्ट धरला. अर्शिया यांनी ड्यूटीवर असलेल्या अस्लम जमादार यांना याबाबत सांगितलं. त्यानंतर काही वेळाने घरात बाप्पांचं आगमन झाल्याचा फोटोच अर्शिया यांनी अस्लम जमादार यांना पाठवला. घरात बाप्पा आल्याने अब्रार अतिशय खूश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मागच्या वर्षी अब्रार शेजाऱ्यांसोबत गणपती आणायला गेला होता. तेव्हापासूनच त्याला बाप्पाचा लळा लागला. परंतु शेजाऱ्यांची बदली झाल्याने यंदा अब्रारला गणपती आणायला जाता आलं आणि मग त्याने बाप्पाला घरीच आणण्याचा हट्ट धरला. विशेष म्हणजे जातीधर्माच्या भिंती मोडून अस्लम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्याने लेकराचा हट्ट पुरवत गणपती घरी आणला विधीवत त्याची प्राणप्रतिष्ठा करुन आरतीही केली.
मूळचे कोल्हापूरचे असलेले अस्लम शेख हे नायब तहसीलदार आहेत. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथे त्यांची पोस्टिंग आहे. अस्लम जमादार यांची ही पोस्ट जास्त वेळा शेअर झाली असून दीड हजारांपेक्षा जास्त जण त्यावर रिअॅक्ट झाले आहेत.
“अब्रार खूप खुश आहे बाप्पासोबत. आता काय ते फक्त एकच मागणं आहे बाप्पाकडं. तुला स्वीकारायची निरागसता अशीच त्याच्या मनात आयुष्यभर राहूदे. बाप होऊन जेंव्हा विचार केला तेंव्हा मुलाचा आनंद आणि बाप्पाचं माझ्या घरात येणं दोन्ही ही खूप सहजपणे स्वीकारता आलं. आयुष्यात ही सहजता अशीच कायम राहूदे रे बाप्पा”
– अस्लम शेख – वडील, नायब तहसीलदार