महाड : महाडमध्ये एक पाच मजली इमारत कोसळली आहे. आज सायंकाळी ही दुर्देवी घटना घडली असून ढिगाऱ्याखाली शंभरच्यावर लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे १५० ते १७५ रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली आहे. मात्र, अंधार पडू लागल्याने मदतकार्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. ही इमारत जास्त जुनी नव्हती. धोकादायकही नव्हती. तरीही इमारत कोसळली कशी? असा सवाल करत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं. या इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं का? याचाही तपास केला जाणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाडच्या काजळपुरा येथे तारीक गार्डन नावाची एक पाच मजली इमारत आज सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अचानक कोसळली. इमारती कोसळल्याचा आवाज आल्याने इमारतीतील १० ते १५ लोक जीवमुठीत घेऊन घराबाहेर पळाल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र इमारतीतील सुमारे १५० ते १७५ लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त आहे. इमारत कोसळल्याचा प्रचंड आवाज आल्याने सुरुवातीला परिसरातील लोक हादरून गेले. त्यानंतर प्रचंड धूर झाल्याने नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी त्यांना इमारत कोसळून सिमेंट, माती आणि फर्निचरचा प्रचंड ढिगारा दिसला.
अनेक लोकांचा आक्रोश आणि विव्हळण्याचा ढिगाऱ्याखालून आवाज आल्याने स्थानिकांनी तात्काळ मदतकार्यास सुरुवात करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला.
या इमारतीत एकूण ४८ कुटुंब राहत होते. एकूण २०० ते २२५ लोक या इमारतीत राहत असल्याने इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १५० पेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही इमारत १० वर्षांपूर्वीच बांधलेली होती. एवढी नवीन इमारत असतानाही ही इमारत कोसलळ्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पालक मंत्री आदिती ठाकरे यांनीही या ठिकाणी मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचं सांगितलं. इमारतीचे वरचे तीन मजले आधी कोसळले. त्यानंतर पूर्ण इमारत जमीनदोस्त झाली. इमारत कोसळत असल्याने १० ते १५ लोक जीवमुठीत घेऊन पळाल्याने ते बचावले असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं.
* २५ जणांना काढण्यात यश
अग्निशमन दल आणि बचाव पथकाच्या चार टीमने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून २५ लोकांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी बचावकार्य अद्याप सुरू असून अंधार पडू लागल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे. महाडमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र पाऊस सुरू झाल्यास मदतकार्य करणे कठीण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २५ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.
“आपण आमदार भरत गोगावले व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत चर्चा केली असून घटनास्थळी जलदगतीने बचावकार्य आणि मदतकार्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.”
उद्धव ठाकरे – मुख्यमंत्री