दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांचे भाजपशी साटे – लोटे आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वपक्षातील वरिष्ठ नेत्यांवर भाजपशी साटलोटं असल्याचा गंभीर आरोप केला. हा आरोप होताच पक्षातील वरिष्ठ नेते कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद चांगलेच भडकले. गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधी यांनी आरोप सिद्ध केल्यास थेट राजीनामा देऊ असे जाहीर आव्हान दिले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राहुलला आव्हान दिले की, माझे भाजपशी संबंध असल्याचे सिद्ध झाले तर काँग्रेसचा राजीनामा देईन. काँग्रेसचे दुसरे जेष्ठ नेते यांच्यावरही राहुल यांनीही हा आरोप खोडून काढला आहे व ३० वर्षात कधीही भाजपाच्या समर्थनात वक्तव्य केले नाही, असे ठणकावून सांगितले आहे. पक्षाची राजकीय घसरण थांबण्यासाठी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असावा व पक्षांतर्गत निवडणुका घ्या, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी याना पत्र पाठवले होते. त्या नेत्यांमध्ये सिब्बल आणि आझाद यांचाही समावेश आहे. या पत्राच्या अनुषंगाने आज सोमवारी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. याबैठकीत राहुल गांधी यांनी ‘ते’ पत्र पाठवणाऱ्या नेत्याचे भाजपाशी साटे – लोटे असल्याचा आरोप केल्याने वातावरण तापले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीदरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस नेतृत्वाबद्दल लिहिलेल्या पत्रावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे पत्र पाठवण्याऱ्या नेत्यांनी भाजपाला पूरक भूमिका घेतली, असा आरोप केला होता. राहुल गांधींच्या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीदेखील थेट पक्ष सोडण्याची तयारी दर्शवली.
राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली, भूपिंदर हुड्डा, आनंद शर्मा, कपिल सिबल, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, शशी थरूर आदी २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. पत्रात सोनिया किंवा राहुल गांधी यांच्यावर प्रत्यक्ष टिप्पणी करण्यात आलेली नाही, मात्र जनतेशी संपर्कात राहणाऱ्या सक्रिय नेतृत्वाची पक्षाला गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे.
या पत्राची सोनिया गांधी यांनी दखल घेतली असून अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली आहे. याचसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसची बैठक घेण्यात आली असून त्यामध्ये काँग्रेस पक्षातील मतभेद समोर येत असल्याचे वृत्त आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात पक्षाचा संघर्ष सुरु असताना आणि सोनिया गांधी आजारी असताना हे पत्र का पाठवण्यात आले? असा सवाल राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत विचारल्याचे एएनआयने म्हटलं आहे.
* कपिल सिब्बल यांचे ट्वीट डीलीट
कपिल सिब्बल म्हणाले – राहुल गांधी म्हणतात की आमचे भाजपासोबत साटे – लोटे आहे. राजस्थान उच्च न्यायालयात आम्ही विजय मिळवून दिला. मणिपूरमध्ये भाजपाच्या विरोधात आम्ही संपूर्ण ताकदीनीशी उतरलो होतो. गेल्या ३० वर्षांमध्ये भाजपाच्या बाजूनं एकही वक्तव्य केलं नाही. तरी आमच्यावर असे आरोप केले जात आहेत! त्यांनी ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त केली. परंतु, त्यानंतर माझा राहुल गांधी यांच्याशी संपर्क झाला असून त्यांनी असे वक्तव्य न केल्याचे सांगत सिब्बल यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले. या ट्विटनंतर कपिल सिब्बल यांनी आणखी एक ट्विट केलं. राहुल गांधींनी स्वत: सांगितलं की त्यांनी अशा शब्दांचा वापर केला नाही. त्यामुळे मी माझं आधीचं ट्विट काढतो आहे.