सांगली : इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात टाटा ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पीटलच्या उद्घाटनानंतर वाळवा आणि शिराळा तालुक्याला कोरोनाचा दणका बसल्याची चिन्हे दिसू लागले अहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात काही पदाधिकारी, नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
आठ दिवसापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्य मंत्री विश्वजीत कदम, आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या कोविड उपचार केंद्राचे उद्घाटन झाले. प्रमुख मंत्री उपस्थित असल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी हजर होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उपजिल्हा रुग्णालयात उद्घाटन सोहळा पार पाडून येथील राजारामबापू नाट्यगृहात आढावा बैठक पार पडली. काही दिवसातच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. मात्र आता याचे गंभीर परिणाम समोर येऊ लागले आहेत.
काही नगरसेवक, काही अधिकारी व काही नेते गेल्या आठ दिवसात एक एक करुन कोरोना बाधीत निष्पन्न होऊ लागले आहेत.
उपस्थिती लावणारे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले. या कार्यक्रमानंतर अनेकांनी स्वतःला कोरोनाबाधीत झालेल्या प्रशासकीय अधिकारी व नेत्यांच्या संपर्कात आल्याने घरात क्वारंटाईन करुन घेतले आहे. कोरोनाचा विळखा गच्च आवळू लागला आहे.
मोजक्याच लोकांनी हा उद्घाटन सोहळा पार पाडायला पाहिजे होता. मात्र तसे न झाल्याने अनेकांना बाधा झाल्याची चर्चा सुरु आहे. कार्यक्रमाला उपस्थित असलेले पदाधिकारी व अधिकारी पॉझीटीव्ह आले आहेत. त्यांनी मात्र पॉझीटीव्ह आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार न घेता कोल्हापूर, मुंबई किंवा अन्य ठिकाणी उपचारासाठी धूम ठोकली आहे.