माढा : किरकोळ कारणावरून मंगळवारी सकाळी 7 वाजता माढ्यातील पारधी कुटुंबातील झालेल्या मारहाणीनंतर एका विवाहित महिलेला पेट्रोल टाकून पेटवून दिले गेले. दरम्यान बार्शी येथील रूग्णालयात उपचार घेत असताना काल रात्री उशिरा ती मयत झाली आहे. अविदा जब्बार शिंदे असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद माढा पोलिसात मयताचे पती जब्बार भानुदास शिंदे (वय 55 ) याने दिली. यात एकूण 14 जणावर माढा पोलिसात गुन्हा दाखल झाला. यापैकी दोन गुन्ह्यातील एकूण 8 आरोपींना अटक केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माढा शहरातील पाणीपुरवठ्याच्या टाकीजवळ पारधी कुटुंबाची वस्ती आहे. जब्बार शिंदे हा आपल्या अविदा या पत्नीसह व दोन मुले व एक मुलगीसह येथे राहतो. शेजारी राहणाऱ्या संजय बबड्या काळे याच्या सुनेच्या माळशिरस येथील नातेवाईकांना का बोलावले म्हणून शिंदे व काळे कुटुंबात वाद झाला होता.
माढा पोलिसात दाखल फिर्यादीवरून मंगळवारी सकाळी 7 वाजता पुन्हा याच विषयावरून वाद झाला. यावेळी अविदा शिंदे हिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यावेळी पती जब्बार व मुलास काठीनी मारहाण केली.
या प्रकरणी संजय बबड्या काळे अरविंद संजय काळे श्रीकांत सुभाष शिंदे सुभाष भानुदास शिंदे मीरा संजय काळे मंगल अजय पवार श्रीदेवी अरविंद काळे पूजा श्रीकांत भोसले लताबाई सुभाष शिंदे अजय भालचंद्र पवार सर्व राहणार माढा यांचेसह अविनाश पर्वत शिंदे सीमा अविनाश शिंदे रविंद्र जगदीश भोसले अक्काबाई रवींद्र भोसले सर्व राहणार कुर्डूवाडी यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला मयत झाल्याने आज सर्व आरोपींवर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि अतुल कादबाने हे करीत आहेत.
काल झालेल्या मारहाणीनंतर संबंधित महिलेला उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय माढा येथून पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हील हाॅस्पीटलला पाठविले. मात्र बार्शी येथे नेल्यानंतर रात्री तिचे निधन झाले. मयताचे नातेवाईकांनी कालपासून माढा पोलीस स्टेशन येथे गर्दी करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. दरम्यान यामधील 8 आरोपींना अटक करण्यात माढा पोलिसांना यश आले आहे. आज दुपारी माढ्यामध्ये तिच्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.