नागपूर : नागपूर महापालिकेतील भाजपा विरोधातील वाद आयुक्त तुकाराम मुंढे यांना भोवला आहे. मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्याजागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन यांना पदभार सोपवून तत्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जबाबदारी स्वीकारावी असा आदेश काढण्यात आला आहे.
दुसरीकडे तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत खुद्द तुकाराम मुंढे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
‘नियम आणि अटींप्रमाणे मी स्वत:ला अलगीकरण (आयसोलेट) केलं आहे. माझ्या संपर्कातील सर्वांनी करोना चाचणी करुन घ्यावी, असेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आपण नक्की जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सदस्य सचिवपदी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूरचे नवीन महापालिका आयुक्त असतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आयुक्तपदी कार्यरत असताना ते सत्ताधारी भाजपविरुद्ध प्रशासन अशा वादात सापडले होते. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. यावरून तुकाराम मुंडे यांना काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली होती.
तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातून सात जणांना नोकरीवरुन काढून टाकलं होतं. पण तुकाराम मुंढे स्वत: स्मार्ट सिटीचे नियमानुसार सीईओ झाले नव्हते. मग त्यांनी सात कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कसं काढलं? अशाप्रकारची याचिका सात कर्मचाऱ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याचबरोबर भाजपचे महापौर आणि नगरसेवकांनी तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.