मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकने 2019-20 मध्ये दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची छपाई केली नाही. यादरम्यान दोन हजारांच्या नोटांचा चलनातील वापर कमी झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या 2019-20 च्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे येणा-या काळात दोन हजाराची नोट बंद होणार का, याबाबत सवाल उपस्थित झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या अहवालानुसार, मार्च, 2018 च्या अखेरीस चलनात असेलल्या 2000 रुपयांच्या नोटांची संख्या 33, 632 लाख होती, मात्र मार्च, 2019 च्या अखेरपर्यंत त्यात घट होऊन 32, 910 लाखांवर आली. मार्च, 2020 च्या अखेरीस चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या आणखी कमी होऊन 27, 398 लाखांवर आली.
चलनातील एकूण नोटांमध्ये मार्च 2020 च्या अखेरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटांचा वाटा 2.4 टक्के राहिला. मार्च 2019 च्या अखेरीस हा वाटा 3 टक्के तर मार्च 2018 च्या अखेरपर्यंत 3.3 टक्के होता, असंही आरबीआयच्या अहवालात म्हटलं आहे.
*2000 रुपयांच्या नोटांचा वाटा घटला
मूल्याच्या हिशेबानेही 2000 रुपयांच्या नोटाचा वाटा घटला आहे. आकडेवारीनुसार मार्च, 2020 पर्यंत चलनातील एकूण नोटांच्या मूल्यामध्ये 2 हजार रुपयांचा नोटांच्या वाट्यात घट होऊन 22.6 टक्के राहिला आहे. मार्च, 2019 च्या अखेरीस 31.2 टक्के आणि मार्च, 2018 च्या अखेरीस 37.3 टक्के होता.
* 2019-20 मध्ये दोन हजारांच्या नोटांची छपाई नाही
अहवालात म्हटलं आहे की, “2019-20 मध्ये दोन हजारांच्या नोटांच्या छपाईसाठी कोणतीही ऑर्डर दिलेली नाही. भारतीय रिझर्व्ह बँक नोट प्रिंटिंग प्रायव्हेट लिमिटेड तसंच सिक्युरिटी प्रिटिंग अँड मींटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून दोन हजारांच्या नोटांची कोणतीही नवी पूर्तता झालेली नाही. 2019-20 मध्ये बँक नोटांची ऑर्डर मागील एक वर्षाच्या तुलनेत 13.1 टक्के कमी होती.
* या नोटांमध्ये वाढ
2018 पासून तीन वर्षांत 500 आणि 200 रुपयांच्या नोटांच्या चलनात उल्लेखनीय वाढ झाली आहे. मूल्य आणि प्रमाण या दोन्हीच्या बाबतीत 500 आणि 200 रुपयांच्या नोटांचं चनल वाढलं आहे, असं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.