मंगळवेढा : संत दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन चरणूकाका पाटील यांचे गुरुवारी (ता. 27) पहाटे दोन वाजता सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे.
मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत चेअरमन (स्व.) कि. रा. मर्दा व (स्व.) रतनचंद शहा या दोघांमध्ये समन्वय करून तालुक्यामध्ये असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या गाळपाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दामाजी कारखान्याच्या स्थापनेत चरणुकाका पाटील यांची महत्त्वाची भूमिका होती.
चरणूकाका पाटील हे ब्रह्मपुरी येथील शेतकरी कुटुंबातील असून साधी राहणी व उच विचारसरणी या उक्तीप्रमाणे माणसातला माणूस ओळखून प्रसंगावधान पाहून ते रंजल्या गांजलेल्यांना मदत करत होते. एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श ठेवून 71 माणसांच्या कुटुंबाचा संसार सांभाळत होते. तसेच गावातील कुठल्याही जातिधर्माच्या लोकांचे सुख-दुःख असो प्रथमतः त्यांच्या कुटुंबात सहभागी होत होते.
दामाजी साखर कारखान्यामध्ये त्यांनी संचालकपद, व्हा. चेअरमन, चेअरमन ही सर्व पदे यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकरी व कामगार हिताचे निर्णय घेत कारखान्याचा कारभार पाहिला. शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, अशी त्यांची आस्था होती.
* दामाजी साखर कारखाना उभारणीत वाटा
भीमा नदीकाठी असणाऱ्या ऊस उत्पादकांना सुरवातीच्या काळात भीमा व इतर कारखान्यांना ऊस न्यावा लागत असे. तालुक्यातील शेतकऱ्यांना तालुक्यातील कारखान्याच्या रूपाने शेतकऱ्यांचा राजवाडा व्हावा, ही संकल्पना सोबत घेऊन कि. रा. मर्दा व रतनचंद शहा त्यांच्या मदतीने कारखाना स्थापन करण्यामध्ये चरणूकाकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. कारखान्यामध्ये काम करत असताना काटकसरीचा कारभार हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते. कारखान्याच्या अडचणीच्या काळात त्यांनी पंढरपूरच्या (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून कारखान्याचा गाडा केला व कामगार आणि शेतकऱ्यांचे हित साधले.