लातूर : कोवीड केअर सेंटर किंवा रूग्णालयात जाऊन कोरोनावरील उपचार घेण्यापेक्षा स्वतःच्या घरी राहूनच होम आयसोलेशनमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. यातूनच गृह विलगीकरणाची अर्थात होम आयसोलेशनची यशस्वी उपचार पद्धत विकसित झाली असून गेल्या ४७ दिवसात तब्बल ४६५ रूग्णांनी या पद्धतीचे अनुकरण केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यामुळेच दवाखान्याची पायरी न चढता तब्बल ९० जणांनी घरूनच कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तीचा हा नवा फंडा जिल्ह्यात चांगलाच फार्मात असून तो आरोग्य यंत्रणेवरील भार हलका करणारा ठरत आहे. हा यशस्वी होम आयसोलेशन फंडा लातूरमध्ये प्रभावी ठरत आहे.
लातूर जिल्ह्यात ६ हजार ९१० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी ४६५ रूग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. त्यापैकी ९० रूग्णांनी घरी राहूनच कोरोनावर मात केली आहे. सध्या ३७५ रूग्ण सध्या गृह विलगीकरणात आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली स्वतः जागरूक राहून काळजी घेत आहेत. कोरोनाबाधित रूग्णांच्या तुलनेत गृह विलगीकरणात उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण सात टक्के असून अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ते सर्वाधिक असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी सांगितले.
* असा आहे होम आयसोलेशन
सरकारने पाच जुलैपासून गृह विलगीकरणाला परवानगी दिली आहे. त्यानुसार अतिसौम्य तसेच लक्षणे नसलेल्यांना घरी राहूनच कोरोनाचे उपचार घेणे शक्य झाले. गृह विलगीकरणासाठी घरी स्वतंत्र खोली व टॉयलेट बाथरूमची आवश्यकता असून तसे प्रमाणपत्र स्थानिक स्वराज्य संस्थेने द्यावे लागते. रूग्णाची २४ तास काळजी घेणारी व्यक्ती व फोनवर तातडीने उपलब्ध होणाऱ्या डॉक्टरांची गरज आहे. डॉक्टरांकडून तसे पत्र घ्यावे लागते. या कागदपत्रानंतर रूग्णाने आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे, मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे तसेच गरज पडल्यास रूग्णालयात दाखल होण्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यास जवळच्या कोवीड केअर सेंटरकडून रूग्णाला गृह विलगीकरणासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येते.