नवी दिल्ली : काँग्रेसचे कन्याकुमारीचे खासदार एच. वसंत कुमार यांचं कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर 10 ऑगस्टपासून चेन्नईमधील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. काल शुक्रवारी रात्री उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय वर्तुळातील अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे.
खासदार वसंत कुमार दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 2019 मध्ये ते लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत पहिल्यांदाच खासदार झाले. देशभरातून खासदार वसंतकुमार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं जात आहे.
राहुल गांधी यांनी शोक व्यक्त करत म्हटलं, ‘काँग्रसचे कन्याकुमारीचे खासदार एच. वसंतकुमार यांचं कोव्हिड 19 मुळे झालेलं निधन खूप धक्कादायक आहे. त्यांची लोकांची सेवा करण्याच्या काँग्रेसच्या विचारांशी निष्ठा नेहमीच मनात घर करुन राहिल. त्यांच्या कुटुंबीयांना आणि स्नेहींसोबत सहवेदना.’
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत खासदार वसंतकुमार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले, ‘लोकसभा सदस्य खासदास एच. वसंतकुमार यांच्या निधनाने दुःख झालं. त्यांचे व्यवसाय आणि सामाजिक कामातील प्रयत्न हे नोंद घेण्यासारखे आहेत. मी त्यांच्याशी ज्या ज्या वेळी भेटलो त्या त्या वेळी त्यांच्या तामिळनाडूच्या प्रगतीसाठीचे प्रयत्न पाहिले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि समर्थकांप्रती सहवेदना. ओम शांती.’