सोलापूर : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी भाजपाच्यावतीने आज राज्यभर घंटानाद आंदोलन केले. त्याचाच एक भाग पंढरपूरमध्ये विठुरायाच्या मंदिरासमोर जिल्हा भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन झाले.
भाजपा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात तालुकाध्यक्ष यांच्या उपस्थितीत व पंढरपूर येथे जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल मंदिरासमोर नामदेव पायरी येथे भाजपाच्या वतीने सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे कडक नियमावली लागू करून तात्काळ उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन केले. सध्याच्या परिस्थितीला लोकांना रोजीरोटी देणार्या प्रत्येक क्षेत्राची बंद राहण्याची क्षमता संपलेली आहे. प्रार्थना स्थळांवर ही अनेक कुटुंबांचे जीवन निर्भर आहे, त्यांची ओढाताण आता थांबायला हवी.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
२१ मार्चपासून राज्यात लाॅकडाऊन आहे. देशातील इतर राज्य अनलाॅकच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत आणि आपण मात्र लाॅकडाऊनमध्येच गुंतून आहोत. राज्य सरकारकडे स्पष्ट असे धोरण नाही. दारूची दुकाने लाॅकडाऊन मध्येच उघडायची परवानगी पण मंदिरं मात्र अद्याप बंद आहेत, बसने अनोळखी लोकांनी एकत्र प्रवास करायला पास गरजेचा नाही पण एकाच कुटुंबातील व्यक्तींनी खाजगी गाडीने प्रवास करायला मात्र पास आवश्यक आहे. झोपी गेलेल्या ठाकरे सरकारला जनतेच्या हालअपेष्टांची चिंताच नाही. आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला असल्याचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.
या वेळी पंढरपूर शहरातील व तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. सर्व नगरसेवक जोगदंड महाराज दिंडी, कोळी समाज बांधव ट्रस्ट व नामदेव पायरी व्यापारी वर्ग, शहर व तालुका महिला पदाधिकारी उपस्थित होते.