सोलापूर : भक्तांच्या भावनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या विरोधात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काळजापूर मारुती मंदिराच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारच्या ‘दार उघड उद्धवा दार उघड’ यासह निषेधाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पुनश्च ‘हरी ओम’ म्हणून हरीलाच बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकर्णासारखे झोपे गेल्याच्या घोषणा दिल्या.
सोलापूर शहरातील मंदिरे सुरू करावीत या मागणीकरिता विविध धार्मिक संघटना , धर्मचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी आज शनिवारी सकाळी 11 वाजता रेल्वे लाईन परिसरात असलेल्या काळजापूर मारुती मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन केला.
यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख,संघटन सरचिटणीस बिज्जू प्रधाने, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास करली, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे, नगरसेवक डॉ. किरण देशमुख, परिवहन सभापती जय साळुंखे, शिवानंद पाटील राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील माॅल, मांस, मदिरा ‘पूनःश्च हरी ओम’ च्या नावाखाली सर्व काही चालू केले. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ‘हरी’ ला मात्र बंदिस्त ठेवले आहे. संतभूमीच्या महाराष्ट्रात मद्य विक्री सुरू आहे. आणि भजन पूजन करणारे भाविक भक्तांवर गुन्हे दाखल होत आहेत. भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल, असा ठाकरे सरकारचा कारभार सुरू असल्याचा आरोप यावेळी केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होत आहे. केंद्र सरकारनेही ४ जून रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू झालेली आहेत. राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम, अटी शर्तीसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तांतून होत आहे. मात्र पूनःश्च हरी ओम म्हणून हरीलाच बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकर्णाच्या झोपेत गेले आहे.
‘दार उघड उद्धवा दार उघड’, ‘दारू नको भक्तीचे दार उघड’, ‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’, ‘भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल’, अशा घोषणांनी काळजापूर मारुती परिसर दुमदुमून गेला होता. सामाजिक अंतर आणि नियमांसह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन कीर्तन व पूजनास परवानगी मिळावी. या मागणीकडे निद्रिस्त ठाकरे सरकारचे लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची प्रतिक्रिया आमदार विजयकुमार देशमुख व अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी व्यक्त केली.
यावेळी नगरसेविका अंबिका पाटील, मेनका चव्हाण, रामेश्वरी बिरू, माजी आमदार नरसिंग मेंगजी, प्रवीण कांबळे, सचिन कुलकर्णी, अनिल कंदलगी, जिल्हा पंतलु अशोक यनंगटी, इंदिरा कुडक्याल यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक, नगरसेविका तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकार, कार्यकर्ते उपस्थित होते.