सोलापूर : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपाने राज्यभर घंटानाद आंदोलन केले. यावर वंचित बहुजन आघाडीने टीका केलीय. भाजपचे ‘दार उघड’ आंदोलन मंदिरासाठी नाही सत्तेसाठी आहे. सत्तेचे दार उघडण्यासाठी हे सारे खटाटोप आहेत. प्रकाश आंबेडकर यांना राज्यभरातून मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे भाजपने आंदोलनाचा फार्स केला असल्याचा आरोप वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांंनी केला.
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर खुले करण्यासंदर्भात वंचितचे होणाऱ्या सोमवारच्या आंदोलनादिवशी माहितीही दिली. यावेळी चंदनशिवे यांनी टीका केली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर प्रथम चंद्रभागा व पुंडलिकाचे दर्शन घेतील व नंतर वारकऱ्यांसमवेत विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील, असे वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी सांगितले. वंचितला राज्यातील वारकरी संप्रदायाचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहून आज भाजप कडून घंटानाद आंदोलन केले जात असून त्यांचे आंदोलन केवळ राजकारणासाठी असल्याची खरमरीत टीका चंदनशिवे यांनी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भाजपने आज शनिवारी रस्त्यावर उतरत मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. पुणे, नागपूर, मुंबई कोल्हापूर, नाशिकसह विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करत ‘दार उघडा उद्धवा’ अशी साद भाजपने घातली आहे. भाजपच्या या आंदोलनाबरोबरच मंदिरे उघडण्यासाठी पहिल्यापासून आग्रही असलेले प्रकाश आंबेडकरही आक्रमक झाले आहेत. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले करण्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारकऱ्यांसमवेत मंदिरात प्रवेश करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. ते येत्या सोमवारी पंढरपुरात लाखो वारक-यांच्यासमवेत मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी मंदिरे व अन्य धार्मिक स्थळांची दारे मात्र अद्याप बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिरे उघडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे.
* मुख्यमंत्र्यांनी गाजर दाखवल्याचा आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर चर्चेचे केवळ गाजर दाखवले मात्र कोणतीही चर्चा घडवून आणली नाही, असा वंचितचे आनंद चंदनशिवे यांनी केला. वारकरी परंपरांचे पालन करीत मंदिर प्रवेश होणार असून राज्यातल्या २०० पेक्षा जास्त संघटनांनी वंचितच्या होणा-या आंदोलनास पाठिंबा दिल्याचा दावाही चंदनशिवे यांनी केला.