टेंभुर्णी : शेतक-यांचा शेतीमाल पाठविण्यासाठी किसान रेल्वेस मोडनिंब येथे थांबा देणेबाबत व रेल्वे स्थानकावर शेतीमाल साठवणुकीसाठी गोडावून उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे आमदार बबनराव शिंदे यांनी केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेवून भारत सरकार सोबत किसान रेल्वे ही वाहतूक व्यवस्था सुरू केली आहे. जेणेकरून या योजनेमुळे शेतक-यांना त्यांचा नाशवंत शेतीमाल लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी शेतीमाल किसान रेल्वे सुरू केली आहे. नुकतीच सांगोला ते दानापूर ही शेतीमाल वाहतुकीसाठी किसान रेल्वे सुरू केली आहे. ही रेल्वे मोडनिंब (ता.माढा) या मार्गाने मार्गक्रमण करीत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माढा मतदारसंघातील मौजे मोडनिंब हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून मोठ्या बाजारपेठेसाठी पूर्वीपासून परिचित आहे. मोडनिंब परिसरामध्ये फळ बागांचे उत्पादन होत असून त्यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, बोर, डाळींब, लिंबू, द्राक्ष, पेरू व इतर पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येत आहे.
सांगोला ते दानापूर या किसान रेल्वेस मोडनिंब येथे थांबा नसल्याने शेतक-यांना त्यांचा माल विक्रीसाठी पाठविणे अडचणी निर्माण होत आहे. त्यांचा माल इतर मार्गाने विक्रीस पाठविल्यामुळे वाहतुकीसाठी जादा पैशे मोजावे लागत असून त्यांना चांगला दर देखील मिळत नाही. परिणाम शेतक-यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मोडनिंब रेल्वे स्थानकावर शेतीमाल साठविण्यासाठी गोडावून उपलब्ध नसल्याने शेतक-यांना त्यांचा माल ठेवण्यासाठी अडचणी येत असून परिणामी शेतीमाल खराब होवून नुकसानी होत आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांचेकडून किसान रेल्वेस थांबा मिळण्यासाठी मागणी होत आहे.
* ताजा माल वेळेत पोहचण्यास मदत
सांगोला-दानापूर या रेल्वेस मोडनिंब रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्यास मोडनिंब व परिसरातील शेतक-यांचा ताजा शेतीमाल वेळेत विक्रीसाठी पाठविणे सोयीचे होवून त्यास चांगला दर मिळणार आहे. मोडनिंब येथून दैनंदिन विक्रीसाठी जाणारा शेतक-यांचा कमी व अधिक प्रमाणातील माल रेल्वेने वाहतुकीसाठी स्विकारणे व शेतीमाल साठविणेसाठी रेल्वे स्थानकावर गोडावून उपलब्ध करुन देण्याबाबत आ. बबनराव शिंदे यांचेकडून संबंधित भारतीय रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.