शिर्डी : भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची दोन्ही नातवंडे बिबट्याच्या संभाव्य हल्ल्यातून थोडक्यात बचावली. अहमदनगरमध्ये ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक झेप घेतली, मात्र समोर कुत्रा आल्याने विखे – पाटील कुटुंब सुदैवाने बचावले.
सुदैवाने तिघांपासून अवघ्या पाच फुटांवर असलेल्या कुत्र्याला जबड्यात पकडले आणि बिबट्या पुन्हा आल्या पावली ऊसात दिसेनासाही झाला. अक्षरशः काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या म्हणीचे मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळते. कुत्रा मध्ये नसता, तर काय संकट ओढवले असते, या कल्पनेनेही अंगावर शहारा येतो. आपल्या कुटुंबावर आलेले संकट कुत्र्याने स्वतःवर घेतल्याच्या शालिनी विखे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शालिनी विखे दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लोणी येथील शेतात नातवंडांना जेवू घालत होत्या. इतक्यात ऊसातून बिबट्याने त्यांच्याकडे झेप घेतली. बिबट्याला पाहून शालिनी विखे यांच्या काळजात धस्स झाले. ही बातमी पसरताच आजूबाजूचे लोक जमा झाले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांनीही शेताकडे धाव घेतली. या घटनेमुळे वनाधिकाऱ्यांची धावपळ उडाली. मात्र सारे आलबेल असल्याने विखे कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील ऊसाच्या शेतात नातवंडांसोबत बसल्या होत्या. पुत्र आणि भाजपचे खासदार सुजय विखे यांची सहा वर्षाची मुलगी अनिशा, तसेच कन्या सुस्मिता यांचा सहा वर्षाचा मुलगा जयवर्धन हे शालिनी विखेंसह होते.