बार्शी : रेशन धान्याच्या काळाबाजारप्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात नाव आल्याने स्वीकृत नगरसेवक प्रशांत रावसाहेब कथले फरार आहेत. अटक टाळण्यासाठी त्यांनी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे.
नगरसेवक कथले यांनी गेल्या पंचवार्षिकला नगराध्यक्षपदाचीही निवडणूक लढविली होती. त्यामध्ये ते पराभूत झाले होते. गेल्या महिन्यात पनवेल येथे बार्शी तालुक्यातून काळाबाजारात गेलेले रेशनचे लाखो रुपयांचे धान्य सापडल्यानंतर बार्शी तालुक्यातही शोध मोहीम राबविण्यात आली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यावेळी वैराग येथील उपबाजार समितीतील आडत व्यापारी सतीश अंबऋषी खेंदाड याच्या गाळ्यात तांदळाच्या 50 किलो वजनाच्या 257 गोण्या व गव्हाच्या 94 गोण्या आढळून आल्या होत्या. त्यात एकूण 17,550 किलो धान्य होते. त्याची बाजारभावाने किंमत 5 लाख 26 हजार रुपये होते.
याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस नाईक संदेश कृष्णदेवराय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गाळाधारक आडत व्यापारी सतीश खेंदाड यास अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत प्रशांत कथले यांचे नाव उघड झाले आहे. त्यामुळे अटकेची शक्यता निर्माण झाल्याने कथले फरार झाले आहेत.