सोलापूर / बार्शी : राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन सुरु असताना, सोलापुरात कोरोना देवीचे मंदिर उघडण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी काही व्यक्तींकडून ‘कोरोना’ नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून तिचे पूजन केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील पारधी वस्ती सध्या याच कोरोना देवीच्या मंदिरामुळे चर्चेत आले आहे. कोरोना महामारीमुळे कोरोना देवीची स्थापना आणि पूजन केल्याचे तेथील नागरिकांनी सांगीतले असून देवीच्या सेवेने आमचे वाईट होणार नसल्याची त्यांची श्रध्दा आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे. इकडे मात्र पारधी वस्तीत कोरोनाचा बिमोड करण्यासाठी कोरोना देवीची स्थापना करुन त्याचे पूजन केल्याने त्यांचा अशिक्षितपणा उघड झाला आहे. विशेष म्हणजे या कोरोना देवीचा प्रभाव ही लोकांना जाणवू लागल्याचं इथल्या वस्तीतल्या लोकांचं म्हणणं आहे.
कहर म्हणून लोक त्यात कशाची जोड देतील याचा नेम नाही. कोरोनादेवीसाठी कोंबडे कापले जातात, देवासाठी हा प्रकार होत असल्याचं सांगितलं जातं आहे. कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर करत असताना इकडे मात्र भलतंच सुरु आहे. आमचा रोग जावा, सुख मिळावे म्हणून कोरोनादेवीला इथे जागा दिली आहे. त्यामुळे देवाच्या कृपेमुळे तोंडाला कपडे लावायची गरज नसल्याचं सांगितलं जातं आहे.
वस्तीतल्या महिलांना ही अकल्पीत देवी मोठा आधार वाटू लागली आहे. आम्ही कोरोनादेवीची स्थापन केली. आम्ही तिला मरेपर्यंत माणणार, आखाडाच्या महिन्यापासून हे सुरु आहे. यापुढेही आयुष्यभर सांभाळणार, देवीपासून आमचे चांगले होईल, अशी आशा या महिलांनी व्यक्त केली आहे.
* भावनेचा बाजार असल्याचं अनिसचं मत
अंधश्रदा विषयक कितीही कायदे काढले तरी समाजातील अंधश्रद्धा अद्यापही हद्दपार होत नाही. आजही भावनेचा बाजार मांडून अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचे काम सुरुच आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील सोलापूर रस्त्यावरील पारधी वस्ती येथे एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करुन, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक फोटोंसह देव्हारा असलेल्या देवघरात लिंबू ठेवून अज्ञातांकडून कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे.
यावर अनिसने हे सर्व भावनेचा बाजार असल्याचे म्हटले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गोष्टीचे समूळ उच्चाटन करण्याची मागणी केली आहे. माणसाचे मन भावनिकतेने विचार करते, त्यातूनच अंधश्रध्देच्या आहारी गेल्याचे दिसून येत असल्याचं अनिसने म्हंटलं आहे.