सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांनी सोलापूरमध्ये 68 लिंगाची स्थापना केली आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. पण त्याचबरोबर श्री सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूरच्या आठही दिशांना स्वहस्ते अष्टविनायकांचीही स्थापना केलेली आहे. याची माहिजी जगभर होण्यासाठी दोन युवकांनी एकत्र येऊन डॉक्युमेंटरी फिल्म तयार केली आहे.
महाराष्ट्रातील अष्टविनायक सर्वांना ठाऊक आहेत, पण सोलापूरचे हे अष्टविनायक बऱ्याच जणांना ठाऊक नाहीत, तर या गणेशोत्सवानिमित्त हे सोलापूरचे अष्टविनायक व त्यांचं दर्शन सर्वांना घरबसल्या करता यावं यासाठी सोलापुरातील कलावंत अमृत ढगे व फिल्मी उत्सवचे डायरेक्टर पवन बारगजे यांनी सामाजिक भावनेतून ठरवलं की या अष्टविनायकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणायचं व आपल्या सोलापूरची आणखी एक वेगळी ओळख जगभरात निर्माण करायची. त्यानुसार त्यांनी हे कार्य केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्या दोघांनी मिळून त्या अष्टविनायकांची माहिती गोळा केली. त्याचा इतिहास, स्थान, दिशा सर्व जाणून घेऊन त्या अष्टविनायकांची एक डॉक्युमेंटरी फिल्म स्वखर्चातून तयार केली. सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही डॉक्युमेंटरी फिल्म तयार केली. ‘फिल्मी उत्सव’ या युट्युब चॅनलवर श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते सोमवारी ( ता. 31 ) ही डॉक्युमेंटरी फिल्म रिलीज केली. त्याचे लोकार्पण केले.
सोलापूरचा इतिहास, सोलापूरची माहिती ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अमृत ढगे व पवन बारगजे यांनी केलेलं हे कार्य खरंच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार धर्मराज काडादी यांनी लोकार्पणावेळी काढले. यापुढेही सोलापुरातील, सोलापूरबद्दलच्या अनेक गोष्टी लोकांसमोर आणण्याचा मानस असल्याचं अमृत ढगे व पवन बारगजे यांनी सांगितले. यावेळी आनंद मुस्तारे, साबळे, राजू विजापुरे यांची उपस्थिती होती.