पुणे : कोरोना काळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.
पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने पांडुरंग रायकर यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. लॉकडाऊन ते अनलॉकिंग आणि मिशन बिगिन अगेनपर्यंत सर्व महत्त्वाच्या घडामोडी पांडुरंग यांनी ‘टीव्ही 9’ च्या माध्यमातून मराठी माणसापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या निधनाने टीव्ही 9 परिवाराला धक्का बसला आहे. मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ई टीव्ही मराठी, एबीपी माझा ते टीव्ही 9 मराठी असा पांडुरंग यांचा पत्रकारितेतील 15 वर्षांचा प्रवास. शेती ते सिनेमा, क्रीडा ते राजकारण अशा विविध विषयांवर पांडुरंग यांनी वार्तांकन केलं. गेल्या तीन वर्षापासून ते टीव्ही 9 मराठीसोबत होते.
पांडुरंग यांच्या निधनाने पुणे पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय, सामजिक क्षेत्र आणि विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाच्या संकटातही अविरतपणे काम करुन बातम्या देणाऱ्या पांडुरंग यांचीच बातमी होते, हा विचारच काळीज पिळवटून जातो. या कठीण काळात पांडुरंग यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी टीव्ही 9 मराठी परिवार खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले आहे.
‘सुराज्य’ परिवाराकडूनही भावपूर्ण श्रद्धांजली