सोलापूर : जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्यामार्फत 8 ते 11 सप्टेंबर या चार दिवशी ऑनलाईन रोजगार मिळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी कळविले आहे.
शासनाने काही अटी व शर्तीच्या अधिन राहून कंपन्या आणि औद्योगिक आस्थापना, व्यवसाय उद्योग सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. लॉकडाऊननंतर नव्याने व्यवसाय उद्योग सुरु करताना जिल्ह्यातील आस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज निर्माण झाली असून स्थानिक बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे.
रोजगार मेळाव्यात ट्रेनी, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मिल अटेंडर, शिप्ट असिस्टंट, कारपेंटर, ड्राप्टसमन, सेल्स एक्झिकेटीव्ह, सर्व्हिस इंजिनिअर, कॉम्प्युटर ऑपरेटर, इन्सुरन्स, ॲडव्हायझर, नर्सिंग फार्मासिस्ट, ड्युटी मेडिकल ऑफिसर, सुपरवायझर, 10 वी पास किंवा नापास, 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अशा प्रकारची एकूण 629 रिक्तपदे आहेत. यासाठी पाच उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन मागणी केलेली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नोकरी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स अथवा टेलीफोन याद्वारे घेण्यात येणार आहेत.
ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी 0217-2622113 या दूरध्वनीवर अथवा solapurrojgar1@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहनही सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.