मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने आपल्या सर्व यूनिट्समधील कंत्राटीवर होणाऱ्या कामाच्या खर्चात कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे कंत्राटदाराद्वारे कंपनीसाठी काम करणारे 20 हजार कामगार बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली आहे.
बीएसएनएलच्या कर्मचारी यूनियनने याबाबत दावा केला आहे. यूनियनने म्हटले आहे की याआधीच कंपनीने 30 हजार कंत्राटी कामगारांची कपात केली आहे. सोबतच मागील एक वर्षांपेक्षा अधिक कालावधीचा त्यांचा पगार दिलेला नाही.
बीएसएनएल कर्मचारी यूनियनचे सरचिटणीस पी. अभिमानी यांनी सांगितले की बीएसएनएलच्या सुमारे 30 हजार कंत्राटी कामगारांना यापूर्वीच काढले आहे. आणखी 20 हजार कंत्राटी कामगारांची कपात करण्याची तयारी सुरू आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी के पुरवार यांना लिहिलेल्या पत्रात युनियनने म्हटले आहे की ऐच्छिक सेवानिवृत्ती योजना (व्हीआरएस) नंतर कंपनीची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. विविध शहरांमध्ये मनुष्यबळ नसल्यामुळे नेटवर्कमधील समस्या वाढली आहे. व्हीआरएसनंतरही बीएसएनएल आपल्या कर्मचार्यांना वेळेवर पैसे देण्यास सक्षम नाही.
यूनियननुसार, गेल्या 14 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे 13 कंत्राटी कामगारांनी आत्महत्या केली आहे. बीएसएनएलने 1 सप्टेंबर रोजी मानव संसाधन संचालकांच्या परवानगीने सर्व मुख्य व्यवस्थापकांना आदेश जारी करत कंत्राटी कामगारांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी त्वरित पावले उचलण्यास सांगितले होते.