सोलापूर : राज्यात काही भागात सध्या जनावरांमध्ये ‘लंम्पी स्कीन’ या विषाणुजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आता जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील काही गावांमधील जनावरांमध्ये या आजाराचा प्रसार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागातर्फे उपाययोजना करण्यास सुरवात करण्यात आली आहे.
दक्षिण सोलापुरातील भंडारकवठे, वडापूर, आनंदनगर, कुसूर, तिऱ्हे (उत्तर सोलापूर) व मोहोळ परिसरातील काही भागात जनावरांना ‘लंम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एप्रिल महिन्यात बीड, परभणी जिल्ह्यातील जनावरांच्यामध्ये याचा प्रादुर्भाव झाला होता. पण, लसीकरणाची मोहीम राबवून तिथे हा आजार नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. पण, आता हा आजार सोलापुरातही आला आहे.
या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग योग्य ती खबरदारी घेत आहे. घरगुती कोणतेही उपचार करु नका, थेट पशू दवाखान्यात जनावरांवर उपचार करावे. आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून तातडीने अलग करावे आणि उपचार सुरू करावेत, अशा सूचना पशुसंवर्धन विभागाने दिल्या.
* जनावराची लक्षणे
जनावरांमध्ये ‘लंम्पी स्कीन’ या विषाणुजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षणे पुढीलप्रमाणे. जनावरांना ताप येणे, त्यानंतर अंगावर गाठी येणे, रोग प्रतिकारशक्ती कमी होणे, रक्तमिश्रित पाणी वाहणे, अशी काही लक्षणे जनावरांच्यामध्ये दिसत आहेत. या आजारासाठी स्वतंत्र लस उपलब्ध नाही. पण, ताप कमी करण्याचे औषध, जीवनसत्वे, प्रतिकारशक्ती वाढण्याच्या औषधाने आजार कमी होतो, असे पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.