सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरूच आहे. तासगाव विधानसभा मतदार संघाच्या आमदार सुमन पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काल शनिवारी त्यांचा स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुलगा रोहित पाटील आणि दीर सुरेश पाटील यांचे अहवाल दोन दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर सांगलीत उपचार सुरू होते. शनिवारी तिघांनाही उपचारासाठी पुण्याला हलवले आहे. आमदार सुमन पाटील यांनी तिघांचीही प्रकृती ठिक असल्याचे सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांच्या घरात तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला. दोन दिवसांपूर्वीच आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील आणि मुलगा रोहित पाटील या दोघांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यानंतर दोघांवर सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. आमदार सुमन पाटील यांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल शनिवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यानंतर तिघांनाही पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले. तिघांची प्रकृती ठीक असून, गेल्या दोन दिवसात संपर्कात आलेल्या लोकांनी वैद्यकीय तपासणी करून दक्षता घ्यावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.
* पोलिस अधीक्षकही बाधित
आटपाडी-खानापूर मतदार संघाचे आमदार अनिल बाबर, जतचे आमदार विक्रम सावंत तसेच माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांचा कोरोना चाचणी अहवालही काल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती.