सोलापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक बिनविरोध झाली. मात्र पडद्याआड ब-याच राजकीया गोष्टी घडल्याने वातावरण तापले आहे. याचे पडसाद जिल्हा परिषदेत उमटू लागले आहेत. जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरुन बळीराम साठेंना हटवून काँग्रेस नेत्यास विरोधी पक्षनेते पद देण्याची मागणी होत आहे.
अध्यक्षपद दिलीप माने यांना दिल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बळीराम साठे यांना जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरुन हटवण्यात यावे. या जागी काँग्रेसच्या सदस्याची निवड करावी असे पत्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी झेडपी अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांना पाठवले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेस भवनमध्ये प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक झाली. कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, अश्फाक बळोरगी, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, सांगोला तालुक्याध्यक्ष दीपक पवार, मंगळवेढ्याचे नंदकुमार पवार, मोहोळचे अशोक देशमुख, माढ्याचे सौदागर जाधव, दक्षिण सोलापूरचे हरिश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना प्रत्येक जिल्ह्यातील निर्णय समन्वयाने घेण्याचा निर्णय झाला. माजी आमदार दिलीप माने यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात विधाने केली. त्या मानेंना राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद दिले. हे करण्यात बळीराम साठे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात घेतले नाही. जिल्हा परिषदेच्या राजकारणात काँग्रेसने राष्ट्रवादीला नेहमीच सहकार्य केले. आता या बदल्यात राष्ट्रवादीने काँग्रेसला सहकार्य करणे अपेक्षित आहे. झेडपीचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या सदस्याला द्यावे, असे मत काही सदस्यांनी मांडले. कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, अश्फाक बळोरगी यांनीही हाच सूर लावला. हे पत्र झेडपी अध्यक्षांना पाठवण्यात आले.
* काका साठेंची पुत्रासाठी हालचाली
जि. प. विरोधी पक्षनेते बळीराम साठे हे पुत्र जितेंद्र साठे यांची बाजार समितीच्या उपसभापतीपदी वर्णी लावण्यासाठी गतीने हालचाल करीत आहेत. मागे हुकलेली संधी परत मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी चालू आहे. दिलीप मानेंना दूध संघाच्या निवडणुकीत बिनविरोधसाठी मदत करुन मुलगा जितेंद्र साठेंचा मार्ग सुकर करण्याच्या गणित जुळवले गेल्याचे बोलले जात आहे. काकासाठे यांनी एकदा माध्यमांशी बोलताना आपण आता मुलासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. आपण आजारीही पडत नाही, आणि दूरही हटत नसल्याने मुलगा आपणास संधी कधी मिळणार विचारत असल्याचे विनोदाने सांगितले होते.
* काँग्रेसचा असाही डाव
झेडपीचा विरोधी पक्षनेता, पक्षनेता ठरवण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला आहेत. झेडपी अध्यक्ष अनिरुध्द कांबळे हे मोहिते-पाटील गटाचे आहेत. मोहिते-पाटील आणि अजित पवार यांच्यात उघड संघर्ष आहे. मोहिते-पाटलांनी कांबळे यांना इशारा करावा. कांबळे यांनी बळीराम साठे यांना हटवून काँग्रेसच्या सदस्याची विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी हा डाव टाकला आहे. यावर राष्ट्रवादी काय करते याकडे लक्ष आहे.