नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत (एनईपी २०२०) ‘२१ व्या शतकातील शालेय शिक्षण’ या विषयावरील संम्मेलनामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी शिक्षणमंत्री रमेश पोखरियालही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्कशीट मुलांसाठी प्रेशरशीट मात्र पालकांसाठी ‘प्रेस्टीजशीट’ बनल्याचे सांगितले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी सल्ले पाठवण्याचे आवाहन केले होते, तर यात 15 लाखांहून अधिक सल्ले आले असल्याचे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधानांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताची भविष्यातील गरज लक्षात घेऊन नवीन विचार आणि मागणीची योग्य सांगड घालून तयार करण्यात आलेले माध्यम आहे असं म्हटलं. मागील चार ते पाच वर्षांपासून हे धोरण ठरवण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली आहे. प्रत्येक क्षेत्रामधील, प्रत्येक भाषेतील व्यक्तींनी या धोरणासाठी काम केलं आहे. मात्र ही केवळ सुरुवात असून काम अद्याप पूर्ण झालेलं नाही, असंही मोदींनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं.
* मार्कशीट झाली प्रेशरशीट
“एक परीक्षा किंवा एक प्रगतीपुस्तक मुलांच्या शिकण्याची शक्ती आणि मानसिक विकास मोजण्याची क्षमता सांगू शकते का?, खरं तर आज मार्कशीट हे मानसिक प्रेशरशीट होताना दिसत आहे. तर पालकांसाठी त्या प्रेस्टीजशिट झाल्यात,” अशा शब्दांमध्ये मोदींनी केवळ गुणांच्या आधारांवर मुलांची बौद्धिक वाढ मोजली जावू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. “मुलं जेव्हा खेळत असतात तेव्हा खेळता खेळताच अनेक गोष्टी शिकतात. ते कुटुंबाबरोबर असताना शिकतात. बाहेर फिरायला गेल्यावर नवीन गोष्टी पाहिल्यावर मुलं त्यातूनही शिकतात. मात्र अनेकदा पालक मुलांना काय शिकला हे विचारत नाहीत तर किती मार्क मिळाले असं विचारतात,” असं म्हणत मोदींनी शिक्षणसंदर्भातील विचारसणी बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं
* कौशल्यामध्ये ‘पाच सी’ महत्त्वाचे
आपल्याला २१ व्या शतकातील नवीन कौशल्य आत्मसात करुन पुढील वाटचाल करायची आहे. २१ व्या शतकामधील या कौशल्यांमध्ये क्रिएटीव्ह थिंकिंग, क्रिएटिव्हीटी, कोलॅब्रेशन, क्युरोसिटी आणि कम्युनिकेशन हे पाच सी अत्यंत महत्वाचे असल्याचे मोदींनी म्हटलं आहे. भाषा हे शिक्षेचे माध्यम आहे हे आपल्याला आता समजून घेतलं पाहिजे. भाषा म्हणजेच पूर्ण शिक्षण हा समज चुकीचा आहे असंही मोदी म्हणाले. जी भाषा मुलांना सहज समजत असेल आणि कळत असेल तीच अभ्यासाची भाषा हवी अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.
* मोदींना आले १५ लाख सल्ले
काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्रालयाने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु केली. त्यानंतर मला देशभरातील शिक्षकांनी माय जीओव्ही (माय गव्हर्मेंट) वर सल्ले पाठवले. एका आठवड्यात मला १५ लाखांहून अधिक सल्ले शिक्षकांनी पाठवले आहेत. या सल्ल्यांचा नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी फायदा होणार आहे, असा विश्वास यावेळी बोलताना मोदींनी व्यक्त केला.