नवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन राज्यसभेत भाजप खासदार रवी किशन यांच्यावर नाव न घेता बरसल्या. मनोरंजन विश्वाचा भाग असलेल्या लोकसभा खासदाराने (ड्रग्जच्या मुद्द्यावरुन) इंडस्ट्रीविरोधात केलेले भाष्य लज्जास्पद असल्याचे त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे त्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या स्वभावानुसार जया बच्चन यांच्यावर पुत्र अभिषेक बच्चन आणि कन्या श्वेता बच्चन-नंदा यांचे नाव घेत गरळ ओकली.
चित्रपटसृष्टीतील अंमली पदार्थांच्या वापराचा मुद्दा खासदार रवी किशन यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. त्याला राज्यसभेच्या शून्य प्रहरात उत्तर देताना जया बच्चन म्हणाल्या की ‘सरकारने मनोरंजन विश्वाच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे, कारण मनोरंजन विश्वच नेहमी सरकारच्या मदतीला येते. एखादी राष्ट्रीय आपत्ती आल्यास ते पुढे येतात, पैसे देतात, सेवा बजावतात. काही जणांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा मलीन करणे चुकीचे आहे” असे जया बच्चन म्हणाल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मनोरंजन विश्वामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव आणि ओळख मिळते, पण मनोरंजन विश्वाचा भाग असलेल्या लोकसभा खासदाराने फिल्म इंडस्ट्रीविरोधात भाष्य केले. याची मला अत्यंत लाज वाटली. ज्या ताटात खाता, त्यातच भोक पाडता. आम्हाला संरक्षण आणि सरकारचा पाठिंबा हवा” अशी मागणी जया बच्चन यांनी केली.
दरम्यान, जयाजींनी माझ्या बोलण्याला पाठिंबा द्यावा अशी माझी अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार रवी किशन यांनी दिली. “मनोरंजन विश्वातील प्रत्येक जण ड्रग्ज घेत नाहीत, परंतु जे घेतात ते जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग संपवण्याच्या योजनेचा एक भाग आहेत. जयाजी आणि मी जेव्हा इंडस्ट्रीत आलो, तेव्हा परिस्थिती अशी नव्हती. पण आता आपल्याला तिचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे” असेही ते म्हणाले.
रवी किशन यांनी लोकसभेत ड्रग्ज संदर्भात भाष्य केलं होतं. बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं वाढतं प्रमाण याबाबत रवी किशन यांनी चिंता व्यक्त केली. सरकारने ड्रग्जचं सेवन करणाऱ्या आणि त्याची तस्करी करणाऱ्यांवर बंदी घालावी, अशी मागणी करताना रवी किशन यांनी एनसीबीचं कौतुकही केलं. “भारतीय सिने जगतात ड्रग्ज घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. या प्रकरणी काही जणांना अटकही केली आहे. एनसीबीही चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य पार पाडत आहे” या शब्दात रवी किशन यांनी एनसीबीचं कौतुक केलं होतं.
* कंगनाचे जया बच्चनवर ट्वीट
“जयाजी, जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेतासोबत किशोरवयात मारहाण, ड्रग्ज देणे आणि विनयभंग झाला असता तर तुम्हीही असेच म्हणाला असतात का? अभिषेकने सतत गुंडगिरी आणि छळवणूक झाल्याबद्दल तक्रार केली असती, आणि एक दिवस तो लटकलेल्या अवस्थेत आढळला असता, तर आपण असेच बोलला असता काय?” असा सवाल अभिनेत्री कंगना रनौत हिने जुही सिंहचा व्हिडीओ शेअर करत विचारला आहे.