नवी दिल्ली : चीनच्या एका कंपनीबरोबर भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने करार केल्याचे आता पुढे आले आहे. पेटीएम या कंपनीमध्ये चीनच्या एका कंपनीची भागीदारी आहे. पेटीएम या कंपनीने आता पेटीएम फर्स्ट गेम्स, असे एक अॅप आणलेले आहे. यासाठी सचिनची सदिच्छादूत म्हणून निवड केल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे सचिनवर सर्वत्र टीका होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सद्य परिस्थितीत भारत आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण वातावरणानंतर सचिन या कंपनीशी कसा काय करार करू शकतो, असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. पेटीएम फर्स्ट गेम्स यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन आमचा सदिच्छादूत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यानंतर अखिल भारतीय व्यापारी संघटनेने सचिनला एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये तू चीनबरोबरच्या कंपनीशी करार यापुढे कायम ठेवून नये, तो मोडावा, अशी विनंती व्यापारी संघटनेने सचिनला केलेली आहे.
सचिनचे देशप्रेम सर्वांना परिचीत आहे. त्यामुळे सचिनकडून अशी चूक होणे गंभीर असल्याचे चाहत्यांना वाटत आहे. कारण सध्याच्या घडीला भारत आणि चीन यांच्यातील संबंध चांगलेच ताणले गेलेले आहेत. या सर्व गोष्टींमुळे चीनच्या विवो कंपनीला आयपीएलचे प्रायोजकत्वही सोडावे लागले होते. त्यामुळे आता सचिनने चीनच्या कंपनीशी करार केला असेल तर त्याने हा करार मोडीत काढावा, अशी विनंती त्याला पत्राच्या माध्यमातून व्यापारी संघटनेने केली आहे.
व्यापारी संघटनेने सचिनला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, ” सध्याच्या घडीला भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या परिस्थितीमध्ये तुमच्यासारखा देशप्रेमी व्यक्ती चीनच्या कंपनीबरोबर कसा काय करार करू शकतो, ही आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. तुमच्यासाठी पैशापेक्षा देशप्रेम महत्वाचे आहे, हे आम्ही जाणतोच. त्यामुळे चीनी कंपनीबरोबरचा हा करार रद्द करावा, अशी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत.”
* सचिनच्या भूमिकेकडे लक्ष
सचिनने याप्रकरणी आपली भूमिका अजून मांडलेली नाही. त्यामुळे सचिन या पत्राला नेमके कसे उत्तर देतो आणि आपली भूमिका कशी मांडतो, याकडे आता सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.