नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटकाळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. काहींना सक्तीच्या रजेने घरी बसवण्यात आले तर काहींनी बिनपगारी काम करावे लागत आहे. पगारकपातीचे संकट तर अनेकांना सहन करावे लागत आहे. कोव्हिडच्या या संकटामुळे यावर्षी अनेकांची पगारवाढ थांबवण्यात आली आहे. त्यामुळे बोनस मिळणे तर दूरची गोष्ट आहे. पण यावेळीही टाटा समुहाने त्यांचे वेगळेपण दाखवून दिले आहे. या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी 235 कोटींचा बोनस जाहीर केला आहे.
कोरोनाच्या संकटकाळात होणारी ही आर्थिक मदत या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आहे. टाटा स्टीलने सोमवारी या बोनसबाबत घोषणा केली.
टाटा स्टीलकडून एकूण 235.54 कोटी रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. या बोनसचे वाटप एकूण 24 हजार 74 कर्मचाऱ्यांमध्ये होणार आहे. जमशेदपूर युनिटमधील ट्यूब डिव्हिजनच्या एकूण 12 हजार 807 कर्मचाऱ्यांना 142.05 कोटी रुपये तर उर्वरित 93.49 कोटी रुपये कलिंगानगर युनिट, मार्केटिंग आणि विक्री, नोवामुंडी, जामाडोबा, झरिया आणि बोकारो मायनसच्या 11 हजार 267 कर्मचाऱ्यामध्ये वाटली जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या या घोषणेनंतर कर्मचाऱ्याना कमीत कमी 26 हजार 839 तर जास्तीत जास्त 3 लाख 1 हजार 402 रुपये मिळतील. बोनसची रक्कम याआधी निश्चित केलेल्या फॉर्मूल्यानुसार दिली जाणार आहे. टाटा स्टीलच्या या बोनस करारावर टाटा स्टीलचे एमडी टीव्ही नरेंद्रन आणि टाटा वर्कर्स युनियनचे अध्यक्ष आर रवी यांनी स्वाक्षरी केली आहे. अहवालातील माहितीनुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत ही रक्कम 4 कोटी रुपयांनी कमी आहे.
* यावर्षी मिळणारी बोनसची रक्कम जास्त
यावर्षी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये अधिक रक्कम पोहचणार आहे. या अहवालात दिलेल्या माहितीच्या आधारे, ग्रेट रिव्हिजननुसार वाढलेले बेसिक पे, डीए आणि 18 महिन्यातील अनुशेष यामुळे या वर्षी बोनसची रक्कम अधिक असेल. गेल्यावर्षीपेक्षा बोनसची रक्कम 2.7 टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्यावर्षी 15.6 टक्के तर यावर्षी 12.9 टक्के बोनस मिळत आहे. मात्र गेल्यावर्षी बोनसची जास्तीत जास्त रक्कम 2.36 लाख होती, तिच यावर्षी 3.01 लाख आहे.
* कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांबद्दल नाराजी
कोरोना काळामध्ये लॉकडाऊन झाल्याने अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरु केली आहे. छोट्या मोठ्या खासगीच नाही तर एअर इंडियानेही पाच वर्षे कर्मचाऱ्यांना बिनपगारी घरी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या साऱ्या कर्मचारी कपातीवर टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा चांगलेच भडकले आहेत. त्यांनी या कंपन्यांना चांगलेच सुनावले आहे. टाटा यांनी एका ठिकाणी दिलेल्या मुलाखती प्रतिक्रिया दिली होती.
कोरोना काळात कंपन्यांमधून अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जात आहे. यावरून असे वाटत आहे की, कंपन्यांच्या मुख्य नेतृत्वाकडे सहानुभूतीची कमतरता झाली आहे. ज्या लोकांनी त्यांचे पूर्ण करिअर कंपनीसाठी खर्ची घातले त्या लोकांना पाठिंबा देण्याऐवजी बेरोजगार केले जात आहे, असा आरोप टाटा यांनी केला आहे.