मुंबई : अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने सात दिवसांमध्ये मराठी भाषेचा पर्याय त्यांच्या अॅपवर आणावा अन्यथा मनसे स्टाईल समाचार घेतला जाईल, असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. मनसे नेते अखिल चित्रे यांनी या दोन्ही कार्यालयांना भेट देऊन खडे बोलही सुनावले आहेत. सात दिवसांच्या आत मराठीत अॅप सुरु करण्यास सांगितले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनी याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र दाक्षिणात्य भागांमध्ये तेथील भाषांनुसार अॅप सुरु केलं जात असेल तर महाराष्ट्रात का नाही, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
ज्याप्रमाणे या कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य दिलं, तिथे त्यांच्या भाषेत अॅप सुरु केलं तसंच अॅप महाराष्ट्रात मराठीत सुरु करावं अन्यथा या कंपनीचा दिवाळीचा सण मनसे स्टाइल साजरा होईल, असा इशारा मनसेने दिला आहे.
उद्यापासून म्हणजेच १६ ऑक्टोबरपासून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्हीचा फेस्टिव्हल सेल सुरु होतो आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही अनेक उत्पादनांवर मोठी सूट दिली जाणार आहे. शिवाय या दोन्ही कंपन्यांनी वेगवेगळ्या डिल्सही समोर आणण्यास सुरुवात केली आहे. अॅमेझॉन १६ तारखेपासून प्राइम मेंबर्ससाठी तर १७ ऑक्टोबरपासून नॉन प्राइम मेंबर्ससाठी सेलचं आयोजन करतं आहे.
आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला मनसेने मराठीत अॅप आणण्याचा इशारा दिला आहे. ज्याप्रमाणे या कंपन्यांनी दक्षिण भारतातील भाषांना प्राधान्य देऊन त्या भाषेत अॅप सुरु केलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत अॅप सुरु करावं असंही स्पष्ट केलं आहे. सात दिवसांच्या आत मराठीत अॅप सुरु केलं नाही तर या दोन्ही कंपन्यांची दिवाळी मनसे स्टाइल होईल असाही इशारा दिला आहे.