मुंबई : ऑनलाईन शॉपिंग अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिल्यानंतर ‘अॅमेझॉन’ने नमते घेतल्याचे दिसत आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी मनसेच्या पत्राची दखल घेतली. डिजिटल सेवेत मराठीच्या समावेशासाठी अॅमेझॉनचे शिष्टमंडळ मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
‘अॅमेझॉन’च्या अॅपमध्ये मराठीच्या समावेशाबाबत मनसे नेते अखिल चित्रे यांनी पाठवलेल्या ईमेलला कंपनीने उत्तर दिले. या ईमेलचा स्क्रीनशॉट चित्रे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. “जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिली आहे” असे ‘अॅमेझॉन’च्या वतीने कार्तिक नामक व्यक्तीने लिहिले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अॅमेझॉन’च्या डिजिटल सेवेत मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली. ‘अॅमेझॉन’चं शिष्टमंडळ मुंबईत येणार आहे. राजसाहेब म्हणतात तसं, तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं” असं अखिल चित्रेंनी लिहिलं आहे.
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, या मागणीसाठी मनसेने 15 ऑक्टोबरला संंबंधित कंपन्यांच्या मुंबईतील ऑफिसला धडक दिली होती. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या बीकेसीमधील ऑफिसमध्ये जाऊन मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता.
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा मनसेने दिला. यावेळी अखिल चित्रे यांनी स्टाफला खडे बोलही सुनावले. जर सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय ठेवला नाही, तर स्टाफला लाथ मारुन बाहेर काढण्याची धमकीही मनसेने दिली होती.