सांगली : अतिवृष्टीमुळे सगळीकडे सारखंच नुकसान झाले आहे. तुमच्या गावात काय वेगळं असणार, तुमच्यातील नुकसान सगळीकडे आहे तसेच असणार. त्यामुळे काय पहायचे आहे, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलंय. या वक्तव्यावरून तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील शेतकरी चांगलेच संतापले. तर दरेकरांना एवढी मग्रुरी कशाला पाहिजे, असा सवाल व्यक्त करीत भाजपच्या कार्यकर्त्यांनीच त्यांचा निषेध केलाय.
गेल्या आठवड्यात राज्यभरात जोरदार अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान, दरेकर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर कवठेएकंद येथे भेट देणार होते.
कवठेएकंद येथील शेतकऱ्यांची भेट व पाहणीचे नियोजन दुपारी साडेबारा वाजता नियोजित होते. त्यामुळे गावातील भाजपचे पंचायत समितीचे सदस्य संतोष आठवले यांच्यासह सर्व भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दरेकरांना नुकसान झालेले क्षेत्र दाखवण्याचे नियोजन केले होते. शिवाय गावातील अतिनुकसान झालेल्या कुटुंबांना मदतीचे किट देण्याचे नियोजनही भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले होते. हे किट दरेकरांच्या हस्ते देण्यात येणार होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र दरेकर यांना कवठेएकंद येथे येण्यास साडेचार वाजले. शेतकरी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते दरेकर यांची वाट पाहून कंटाळले होते. मात्र कवठेएकंदमार्गे सांगलीला जाताना दरेकर कवठेएकंद येथे थांबले नाहीत. केवळ गाडी थांबवली. गाडीची काच खाली घेतली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी दरेकर यांना नुकसानीची पाहणी करा. शिवाय नुकसानग्रस्तांना मदतीचे किट तुमच्या हस्ते द्या, अशी मागणी केली.
मात्र, दरेकर यांनी गाडीतून खाली न उतरताच केवळ आपल्या आलिशान गाडीची काच खाली करून ‘सगळीकडे सारखेच नुकसान झाले आहे. तुमच्यात काय वेगळं असणार. त्यामुळे इथे काय पहायचे’, असे वक्तव्य केले आणि शेतकऱ्यांची कोणतीही विचारपूस न करता गाडीच्या काचा वर करीत एसीची हवा खात ते निघून गेले.
प्रवीण दरेकरांच्या या वक्तव्यावर कवठेएकंद येथील शेतकरी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सडकून टीका केली आहे. संतप्त शेतकरी व कार्यकर्त्यांनी दरेकरांचा निषेध केला आहे. दरेकर यांना भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून दिल्या गेल्या या घरच्या आहेराबाबत चर्चा झाली. यावेळी दीपक घोरपडे, दीपक जाधव, जयवंत माळी, बाळासो शिरोटे, बाळासो पवार, राहुल शिरोटे, गुंडाभाऊ मेणगुदले, आनंदराव काळे, संजय शिरतोडे, महादेव काळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.