मुंबई : कधी कोरोना, कधी अतिवृष्टी तर कधी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ठप्प झालेल्या लोकल सेवा अशा अनेक ऐनकेन कारणांमुळे यंदा सीईटीचे विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने या विद्यार्थ्यांना दिलासा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना (नोंदणी केलेल्या) काही अपरिहार्य कारणांमुळे एमएचटी सीईटी परीक्षा देता आली नाही, त्यांच्यासाठी आणखी एक संधी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अतिरिक्त सत्रासाठी अर्ज करायचा आहे. ही नोंदणी २२ आणि २३ ऑक्टोबर २०२० या दोन दिवशी सुरू राहणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विद्यार्थ्यांना नोंदणी करतानाच अतिरिक्त सत्रासाठी १०० रुपये शुल्क देखील भरायचे आहे. हे शुल्क कॅप प्रोसेसच्या वेळी ऍडजस्ट केले जाणार असल्याचे सीईटी सेलने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, ‘१ ते ९ ऑक्टोबर आणि १२ ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते.
मात्र या कालावधीत काही नसर्गिक आणि आपत्कालीन संकटांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही आणि त्यांची परीक्षा हुकली. अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही ग्रुपच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ज्यांचे हॉलतिकीट आले होते, मात्र परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करून १०० रुपये शुल्क भरायचे आहे. त्यांच्यासाठी अतिरक्त सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.
* हे लक्षात ठेवा
सीईटी सेलकडून एमसीए सीईटी २०२० चे हॉलतिकिट म्हणजेच अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत, ते सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकणार आहेत. ही प्रवेश परीक्षा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स २०२०-२१ या तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जात आहे. उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड देऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल.