मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकीटावर मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची चिन्हं आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामुळे संसदेत जाता-जाता राहिलेल्या उर्मिला विधीमंडळात प्रवेश करणार का, याची उत्सुकता आहे.
उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेकडून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उर्मिला यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर शिवसेनेशी त्यांची जवळीक वाढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेकडून उर्मिला यांची विधीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे.
45 वर्षीय उर्मिला मातोंडकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उर्मिला यांचे रंगीला, प्यार तुने क्या किया, भूत, कौन यासारखे असंख्य चित्रपट गाजले आहेत. उर्मिला यांच्या डान्सचेही चाहते आहेत. त्यांनी काही रिअॅलिटी शोंचं परीक्षणही केलं आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या बॉलिवूडमध्ये फारशा दिसल्या नव्हत्या. काही वर्षांपूर्वी ‘आजोबा’ या मराठी चित्रपटात त्या झळकल्या.
राजकारणातून आपली सेकंड इनिंग सुरु करणाऱ्या उर्मिला यांनी अकाली राजकीय एक्झिट घेतल्याची चर्चा होती. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास ‘मराठी मुलगी’ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.