मुंबई : देशभरातील बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे काल शुक्रवारी रात्री उशिरा दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. संत रामराव महाराज हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थानचे प्रमुख होते.
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना 17 ऑक्टोबरला उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री 11.30 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यामुळे देशभरातील बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रामराव महाराजांनी 1948 मध्ये पोहरादेवी येथील गादीवर बसल्यानंतर अन्नत्याग केला. त्यानंतर ते फक्त कडूनिंब, दूध आणि फळांचे सेवन करत होते. गेल्या काही महिन्यांपासून दूध घेतानाही त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे ते फक्त कडूनिंब आणि ज्यूस घेत होते. मात्र त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली.
वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाणी बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या संत सेवालाल महाराज, आई जगदंबामाता आणि राष्ट्रीय संत डॉ. रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येथे हजेरी लावलात.
तसेच देशातील अनेक राजकीय नेत्यांचीही या ठिकाणी उपस्थित राहतात. दरम्यान आज 31 ऑक्टोबर रोजी त्यांचे वाशिम जिल्ह्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.