मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ, पत्रकार अर्णब गोस्वामी यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अलिबाग कोर्टाकडून अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयांनी कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. आज सकाळी अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली.
गोस्वामी यांच्यासह इतर २ आरोपींनासुद्धा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फोरोज शेख आणि नितेश सारडा अशी इतर दोन आरोपींची नावं आहेत.
दरम्यान तिनही आरोपींनी त्यांना जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आपलं म्हणण मांडण्यासाठी कोर्टानं पोलिसांना वेळ दिलेला आहे. पण, कोर्टानं जामीन अर्जावरील सुनावणीसाठी निश्चित तारीख दिलेली नाही, आरोपींचे वकली सुशील पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
‘अ समरी’ रिपोर्ट मान्य झाल्यावर पुन्हा केसचा तपास करण्यासाठी न्यायालयाची मंजुरी घेतली नाही, पोलिसांवर असा ठपका ठेवत कोर्टानं पोलिसांना अर्णब गोस्वामी यांची पोलीस कोठडी नाकारली आहे.
अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू या घटनेशी आरोपींचा थेट संबंध प्रस्तापित व्हायला हवा, तो पोलिसांना करता आला नाही. तसंच आरोपींची पोलीस कोठडी घेण्यासाठी सबळ पुराव्याची गरज आहे, असं म्हणत कोर्टानं पोलिसांना कोठडी देण्यास नकार दिला आहे.
अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना अलीबागच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान आज बुधवारी सकाळी अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या सरकारी कामात अडथळा घातल्याप्रकरणी त्यांच्यावर ३५३ कलमांतर्गत आणखी एक FIR दाखल करण्यात आली आहे.
आज सकाळी अर्णब गोस्वामी यांना अटक झाली तेंव्हा धक्काबुक्की झाल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला. त्यामध्ये त्यांना हाताला आणि पाठीला दुखापत झाल्याचे देखील म्हंटले. त्याबाबत पोलिसांकडून काही व्हिडीओ स्वरूपातील पुरावे देखील सादर करण्यात आले. दरम्यान कोर्टाने अर्णब यांचा दावा फेटाळून लावल्याची माहिती आहे.
* अर्णव गोस्वामींच्या पत्नीस तंबी
अर्णब गोवामी यांच्या पत्नी यांनी देखील कोर्टामध्ये मोबाईलचं रेकॉर्डिंग सुरु ठेवलं होतं अशी माहिती टीव्ही रिपोर्टमधून समोर येते. काही माध्यमांना अक्षरा नाईक यांचे वकील विलास नाईक यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. त्यांच्या माहितीनुसार कोर्टात सुनावणी सुरु असताना अर्णब यांच्या पत्नी यांनी कोर्टात आपला मोबाईल सुरु ठेवून रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता. यावर न्यायाधीशांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि असा प्रकार पुन्हा होऊ नये अशी देखील त्यांना तंबी दिलेली आहे.
दरम्यान, अर्णब गोस्वामी यांची दुसऱ्यांदा मेडिकल टेस्ट केल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता कोर्टात पुन्हा सुनावणीला सुरवात केली गेली. आता अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.