मुंबई : राज्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि काही इनडोअर खेळांना आज ५ नोव्हेंबरपासून
सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती देताना असे म्हटले आहे की, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलावांना परवानगी देण्यात येत आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील.
प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असलेल्या योगा संस्थांना पुनश्च सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड-19 प्रतिबंधक मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोर शूटिंग सारख्या इनडोर क्रीडा प्रकारांनाही शारीरिक अंतर आणि सॅनिटेशनसंबंधी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर पाच नोव्हेंबरपासून मुभा देण्यात येत आहे मात्र धार्मिक स्थळे राहणार बंदच असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. मंदिर प्रवेशासाठी आणखी काही दिवस वेट करावे लागणार आहे.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स यांनाही ५० टक्के आसन व्यवस्था पालन करण्याच्या अटीवर प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर पुन्हा सुरू करण्यासाठीही अनुमती देण्यात आली आहे. परंतु चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्समध्ये कोणत्याही खाद्यपदार्थांना परवानगी नसेल. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना सांस्कृतिक कार्य विभाग तथा स्थानिक प्रशासनाद्वारे लागू असतील.