पुणे : महाराष्ट्र पोलिसांवरील हल्ले काही कमी होताना दिसत नाहीत. काल गुरुवारी पिंपरी चिंचवडमधील एका चालकाने वाहतूक पोलिसास जीवे मारण्याचाच प्रयत्न केला. गाडी रोखणाऱ्या वाहतूक पोलिसास या चालकाने बोनेट वर बसवून एक किलोमीटरपर्यंत सुसाट जीवघेणा प्रवास केला.
दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांच्या प्रसंगावधानपणा दाखवल्याने त्या वाहतूक पोलिसाचा जीव वाचला आहे. हा थरार मोबाईल कॅमेरा आणि सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास अहिंसा चौकात वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत आणि इतर कर्मचारी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तेव्हा चिंचवड स्टेशन चौकाकडून चाफेकर चौकाकडे 50 वर्षीय युवराज हणवते त्यांच्या चारचाकीतून निघाले होते. पण त्यांनी घातलेला मास्क हा नाक आणि तोंड सोडून गळ्याजवळ असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. म्हणून कारवाईसाठी त्यांना हात दाखवला असता हणवते पोबारा करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, त्यांच्या पुढे वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत आले आणि त्यांनी गाडी रोखली. हणवतेंनी थोडावेळ थांबलोय, असं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा रेसवर पाय दिला असता सावंत यांच्या पायाला धक्का लागला.
तेव्हा सावंत यांचा बोनेटच्या दिशेने तोल गेला. ते बोनेट वरून खाली उतरणार तोवर हणवते यांनी गाडीचा वेग वाढवला. ही बाब काही उपस्थित दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांनी पाहिली. मग हणवतेच्या गाडीचा फिल्मी स्टाईल पाठलाग सुरू झाला. काही क्षणातच अहिंसा चौकातून हणवते चाफेकर चौकात पोहचले, मग हणवते यांनी गाडीचा वेग आणखीच वाढवला. गाडी चिंचवड पोलीस स्टेशनसमोर आली, तेव्हा दोन्ही बाजूंनी दोन दुचाकीस्वार, पुढे एक रिक्षा असं घेरण्यात आलं. पण चारचाकी सुसाट होती. सावंत जीव मुठीत घेऊन बोनेटला कसेबसे धरून बसले होते. काही केल्या हणवते थांबायचं नाव घेईना, शेवटी एक दुचाकीस्वाराने शक्कल लढवली आणि पुढे धावणारी मोठी चारचाकी गाडी रस्त्यात थांबवली. तेव्हा मात्र हणवतेसमोर पर्याय उरलाच नाही.
* उलट विचारला जाब; गुन्हा दाखल
गाडी थांबताच सावंतांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मग हणवतेंकडे सर्वांनी मोर्चा वळवला, उपस्थितांनी गाडीला घेरलं आणि हणवतेना गाडीतून बाहेर येण्याची सूचना सुरू झाली. पण ते बाहेर पडलेच नाहीत, उलट मला का अडवलं जात होतं असा उलट जाब विचारायला सुरुवात केली. तेव्हाच हातात फोन घेऊन कोणाला तरी संपर्क साधण्यास हणवतेकडून सुरुवात झाली. हा सर्व थरार मोबाईल कॅमेरा आणि सीसीटीव्हीत कैद झालाय. दुचाकीस्वार, रिक्षाचालक यांचा प्रसंगावधान आणि सुदैव म्हणूनच सावंत यातून बालबाल बचावले. त्यांच्या पायाला मात्र गंभीर इजा झाली. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी, तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने हणवतेवर चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. हणवते हे पिंपळे निलख येथील रहिवाशी असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.